लोकमत न्यूज नेटवर्कपंचवटी : पंचवटी प्रभाग समिती सभापतिपदासाठी भाजपाच्या प्रियंका माने यांचा एकमेव अर्ज आल्याने पिठासन अधिकारी अपर आयुक्त जोतिबा पाटील यांनी माने यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले. पंचवटी प्रभाग समितीची विशेषसभा पिठासन अधिकारी पाटील यांच्या उपस्थितीत पार पडली. पंचवटी प्रभाग समिती सभापतिपदासाठी भाजपाच्या माने यांनी अर्ज दाखल केला होता. निवडणूक निर्णयानुसार अर्ज माघारीसाठी पंधरा मिनिटांचा कालावधी देण्यात आला होता. या कालावधीत अर्ज माघारी न आल्याने व माने यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. पंचवटी प्रभागातील २४ जागांपैकी तब्बल १९ जागांवर भाजपाचे उमेदवार निवडून आलेले असल्याने भाजपाच्या उमेदवाराच्या गळ्यात सभापतिपदाची माळ पडणार हे निश्चित होते. प्रभाग समिती सभापती निवडणुकीला अपक्ष, शिवसेना व मनसेच्या नगरसेवक अनुपस्थित राहिले. यावेळी नगरसचिव अशोक वाघ, विभागीय अधिकारी आर. आर. गोसावी, महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, स्थायी समितीचे सभापती शिवाजी गांगुर्डे, नगरसेवक गणेश गिते, जगदीश पाटील, अरुण पवार, पुंडलिक खोडे, उद्धव निमसे, हेमंत शेट्टी, कमलेश बोडके, मच्ंिछद्र सानप, रूचि कुंभारकर, सुरेश खेताडे, भिकूबाई बागुल, पूनम सोनवणे, पूनम धनगर, शांता हिरे, प्रा. सरिता सोनवणे, सुनीता पिंगळे, शीतल माळोदे आदी उपस्थित होते.
प्रभाग सभापतिपदी प्रियंका माने
By admin | Published: May 21, 2017 1:26 AM