नाशिकरोड : प्रभाग ५५ मधील निसर्ग उपचार केंद्र जॉगिंग ट्रॅकवरील विविध समस्या व अडचणी त्वरित दूर कराव्या, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. मनपा विभागीय अधिकारी कुसुम ठाकरे यांना निसर्गानंद जॉगर्स क्लबतर्फे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जयभवानी रोडवरील जॉगिंग ट्रॅकवरील मुरुमाचा थर वाहून गेल्याने काही ठिकाणी खड्डे पडले आहे तर अनेक ठिकाणी दगडगोटे वर आल्याने ट्रॅकवर फिरण्यास येणाऱ्या नागरिक, महिलांना अडथळ्याच्या शर्यतीप्रमाणे चालावे लागत आहे. तसेच तेथील हिरवळकडे दुर्लक्ष झाल्याने ती जळून गेली आहे. ग्रीन जीमच्या साहित्याची मोडतोड झाली आहे. पथदीप, म्युझिक सिस्टम बंद आहेत. संरक्षण भिंतीच्या जाळी तुटल्याने प्रेमीयुगुलांचा वावर वाढला असून, रात्री मद्यपींच्या पार्ट्या रंगत आहे. प्रभागातील उद्यान व खुल्या राखीव जागेची अत्यंत दुर्दशा झाली असून, झाडेझुडपे व गवत वाढले आहे. मनपा प्रशासनाने त्वरित लक्ष देऊन जॉगिंग ट्रॅकवरील विविध समस्या व अडचणी व प्रभागातील उद्यानाकडे लक्ष द्यावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर क्लबचे संस्थापक विक्रम कदम, बबनराव मुठाळ, लक्ष्मीकांत पाठक, धीरेनकुमार वाजपेयी, अमोल रेवगडे, प्रभाकर देशपांडे, नंदवानी, पुंजा चांगुलकर, वैशाली मोजाड आदिंच्या सह्या आहेत. (प्रतिनिधी)
निसर्ग उपचार केंद्र जॉगिंग ट्रॅकवरील समस्या दूर कराव्या : मागणी
By admin | Published: December 13, 2015 10:36 PM