मालेगाव : जागतिक महामारी कोरोना संपूर्ण जगावर अस्मानी संकट घेऊन आलेला असताना गेल्या तीन महिन्यांपासून शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली होती. आता आॅनलाइन ही नवीन शाळा विद्यार्थी- पालकांना खुणावत आहे. शहरी विद्यार्थी व ग्रामीण विद्यार्थी यांच्या वेगवेगळ्या समस्या आज आ वासून उभ्या आहेत. ग्रामीण भागात आॅनलाइन शिक्षण कसे शक्य होईल याचीच चिंता लागली आहे .ग्रामीण भागात शेतकरी व मजूर मोठ्या प्रमाणात राहत असल्याने त्यांच्याही समस्या वेगळ्या आहेत. आॅनलाइन शिक्षणासाठी लागणारे अॅण्ड्रॉइड मोबाइल याचीच वानवा असल्याने टॅब, संगणक, लॅपटॉप यांचा विषयच नाही. दूरदर्शन जरी असले तरी विजेची समस्या आहेच. आॅनलाइन शिक्षणासाठी लागणारी आवश्यक उपकरणे, इंटरनेट यांचा अतिरिक्त खर्च, उपलब्ध नसणारी रेंज याही समस्या आहेतच. ग्रामीण भागातील पालकांच्या घरात शिक्षण घेणारी मुलं एकापेक्षा अधिक असल्यास तेथे नियोजन करणे अवघड जाणार असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. विद्यार्थ्यांना संपूर्ण आॅनलाइन शिक्षण मिळाल्यास शिक्षक-विद्यार्थी आंतरक्रिया कशी होणार, त्यांचे मूल्यमापन, त्यांना कोणता घटक समजला, नाही समजला त्यांच्याकरिता काय उपाययोजना आहेत याविषयीही पालक अनभिज्ञ आहेत. ज्यांच्याकडे ही साधनेच नाहीत त्यांच्यापर्यंत शिक्षण कसे पोहोचावे याचे नियोजन करावे लागणार आहे.पालकांनी पाल्याजवळ बसून आॅनलाइन अभ्यास पूर्ण करून घेणे अपेक्षित असताना शेतीची वा इतर कामे सोडून ते कसे शक्य आहे या चिंतेत सध्या पालक आहे. दोन, तीन महिने अजून शाळा नाही भरल्या तरी हरकत नाही, पण आॅनलाइनच्या कचाट्यात इतक्या लहान वयात विद्यार्थ्यांना आम्ही टाकू शकत नाही. मानसिक आरोग्यास हानी पोहोचणार नाही याची हमी कोण घेणार आहे? असेही पालक विचारत आहेत.------------------------विद्यार्थ्यांच्या हिताचाच विचार होत आहे, पण आॅनलाइन शिक्षणाकरिता योग्य मार्गदर्शन, प्रशिक्षण पालकांचे होणे गरजेचे आहे. कोरोना पार्श्वभूमीवर पालक आज पाल्यांना शाळेत पाठविण्यास नकार देत आहेत तसेच आॅनलाइन शिक्षणाचेही योग्य समुपदेशन होऊन सर्व विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण कसे पोहोचेल, हे येणारा काळच ठरवेल.- भरत पाटील,उपक्रमशील शिक्षक, मालेगाव
आॅनलाइन शाळा संकल्पनेला ग्रामीण भागात समस्यांचा अडसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2020 9:00 PM