त्र्यंबकेश्वर : येथील पालिका कचरा डेपोचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. शेजारील तहसील कार्यालय, बाजूचा नवनाथ घाट, मुस्लीम बांधवांच्या दफनभूमीकडे जाणारा रस्ता आणि पालिकेच्या वैकुंठधाम स्मशानभूमीच्या उत्तर पश्चिम बाजूला नव्याने कचरा डेपो साकारला आहे. त्यामुळे पालिका कर्मचारी, लांडे बिल्डिंगमधील रहिवासी व तहसील कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून, याविरोधात मधुकर लांडे, श्रीमती लांडे व तेथील रहिवाशांनी उपोषणाचा निर्णय घेतला आहे. नव्याने ढीग होत असलेला कचरा डेपोने आता शेजारील तहसील कार्यालय, समोरीलच लांडे बिल्डिंग, स्वामी पॅलेस, बागुल बिल्डिंग, सोनवणे वस्ती, पालिका वसाहत आदि ठिकाणच्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शहरवासीयांनी उलट्या-जुलाबाची साथ अनुभवली. त्यात कचऱ्याच्या दुर्गंधीने रहिवासी हैराण झाले आहेत. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मात्र रडत कढत का होईना नाशिक महापालिकेने कचरा स्वीकारला होता. त्या बदल्यात त्र्यंबक पालिकेने वाहतुकीचा खर्च अदा केला होता. आता नाशिक मनपाने त्र्यंबक पालिकेचा कचरा उचलणे बंद केले आहे. कारण पालिकेला पुढे पैसे देणे परवडणारे नाही. सिंहस्थ अनुदानातून त्यावेळी खर्च अदा केला गेला. पण आता त्या कचरा डेपोचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्र्यंबक पालिकेकडून कचरा डेपोसाठी परिसरात ठिकठिकाणी जागा शोधल्या होत्या. त्यासाठी निधीही उपलब्ध आहे. संबंधित गावाच्या विरोधामुळे जागा मिळत नाही. कोजुली येथील जागा शासनाने हस्तांतरित ताबाही दिला आहे; मात्र आता संबंधित ग्रामपंचायत ग्रुप ग्रामपंचायतीच्या ग्रामस्थांनी पुण्याच्या हरित लवादाकडे दाद मागितली आहे. त्र्यंबक नगरपालिकेपुढे कचरा डेपोचा प्रश्न उभा ठाकला आहे. शहरातील कमी जागा आणि दिवसेंदिवस वाढणारी लोकसंख्या अशा पेचात पालिका सापडली आहे. (वार्ताहर)
कचरा डेपोने पुन्हा उभ्या केल्या समस्या
By admin | Published: January 10, 2016 10:38 PM