सर्वसामान्य नागरिकांना सातबारा उतारे मिळण्यासाठी तलाठी कार्यालयाकडून होणारा त्रास कमी करण्यासाठी डिजिटल सातबारा उतारे ऑनलाइन उपलब्ध करून दिल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय दूर झाली. परंतु तालुक्यात तीन दिवसांपासून ऑनलाइन सातबारा व खाते उतारा मिळणे बंद झाले असून संबंधित सर्व्हर बंद असल्याने शेतकऱ्यांसह सर्वसामान्य जनतेचे प्रचंड हाल होत आहेत. महसूल प्रशासनाने तलाठ्यांना पूर्वीप्रमाणे हस्ताक्षरात सातबारा देण्याबाबत आदेश करण्याची मागणी केली जात आहे. देवळा तालुक्यात तलाठ्यांची काही पदे रिक्त असून एका तलाठ्याला अतिरिक्त गावांचा कारभार पाहावा लागत आहे. शेतकरी व नागरिक सातबारा उतारा व खाते उतारा घेण्यासाठी ई-सेवा केंद्रांचे उंबरठे झिजवीत असून शेतकऱ्यांची धावपळ वाढली आहे. जमिनीचा मालकी हक्क दर्शविणारा पुरावा म्हणून सातबारा उताऱ्याला महत्त्व आहे. अनेक वेळा तलाठ्यांशी न होणारा संपर्क, वारंवार डाऊन असलेला सर्व्हर आदी विविध कारणांमुळे सातबारा उताऱ्यासाठी शेतकऱ्यांना तलाठी कार्यालयामध्ये वारंवार खेटे मारावे लागतात. लोकांची होणारी ही गैरसोय लक्षात घेऊन शासनाने २०१३ पासून महसूल व वन विभाग अधिकारी अभिलेखातील नोंदी व त्यांच्या कार्यपद्धतीचे संगणकीकरण करून ई-फेरफार कार्यक्रम संपूर्ण राज्यात राबविला. परंतु, हा कार्यक्रमच आता अडचणींच्या फेऱ्यात सापडला आहे.दोन दिवसांपासून सातबारा उतारा मिळण्यासाठी कामधंदा सोडून खेट्या मारीत आहे. सातबारा उतारा मिळू शकत नसल्याने अनेक शेतकरी शासकीय योजनांपासून वंचित राहण्याची शक्यता बळावली आहे. अनेकांना घरे, शेती खरेदी करण्यासाठीदेखील सातबारा उतारा आवश्यक असतो. तांत्रिक अडचणीमुळे सातबारा उतारे ऑनलाइन मिळत नसतील त्या कालावधीत पूर्वीच्या प्रचलित पद्धतीने उतारे देण्यात येऊन शेतकऱ्यांची गैरसोय दूर करावी.- नानाजी निकम, शेतकरी, गुंजाळनगर
ऑनलाइन सातबाऱ्याला अडचणींचा एरर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2021 7:59 PM
देवळा : तीन दिवसांपासून ऑनलाइन डिजिटल सातबारा उतारा मिळत नसल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. महसूल विभागातर्फे राबविल्या जात असलेल्या ई-फेरफार प्रक्रियेंतर्गत नागरिकांना डिजिटल सातबारा उतारे उपलब्ध करून देण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राज्य शासनाने सुरू केला, पण त्यात अडचणी येत असल्याची नागरिकांची तक्रार आहे.
ठळक मुद्देदेवळा : उतारा मिळत नसल्यामुळे नागरिक त्रस्त