नाशिक : दहा वर्षांपूर्वी जलसंपदा विभागाने आखलेल्या पूररेषेमुळे शेकडो मिळकती त्यात अडकल्या असून गावठाणाची सुटकाही झालेली नाही. एकीकडे पूररेषेतील वाड्यांच्या पुनर्विकासासाठी परवानगी दिली जात नाही आणि दुसरीकडे मात्र वाडे धोकादायक असल्याने ते रिक्त करण्यासाठी नोटिसा दिल्या जात आहेत. त्यामुळे मूळ प्रश्न कसा सुटणार? वाड्यांच्या समस्या सोडविण्यासाठी मुळात पुराची आणि पूररेषेची तीव्रता कमी करण्याचा जो प्रामाणिक उपाय होता तोच न केल्याने समस्या कायम आहे.शहरात येणाऱ्या पुराचा मोठा फटका गोदाकाठी असलेल्या भागाला बसतो. नाशिक आणि पंचवटी गावठाणातील भाग सर्वाधिक धोकादायक ठिकाणी आहे. पुराचे पाणी या भागात शिरत असल्याने नागरिक सतर्क असतात. मात्र २००८ मधील महापूर अनपेक्षित होता. गंगापूर धरणातून एकाएकी विसर्ग झाल्याने हा महापूर मानवनिर्मित होता असा ठपका ठेवला गेला, परंतु तसे चौकशी करून यंत्रणा निष्कर्षाप्रत आली असती, तर वेगळा भाग होता हा आक्षेप कायम असतानाही महापालिकेने जलसंपदा विभागाकडून पूररेषा आखून घेतली आणि आ बैल मुझे मार अशी स्थिती उद्भवली आहे. मुळात पुराची तीव्रता कमी होण्यासाठी उपाययोजना केल्या पाहिजे त्या अद्याप केलेल्या नाहीत. महापालिकेने त्यातील एकही उपाययोजना करण्याबाबत जलसंपदा विभागाशी चर्चा केलेली नाही.महापालिकेने पूररेषा आखल्यानंतर पूररेषेतील बांधकामे स्थगित करण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर पूररेषेतील बांधकाम म्हणून नवीन परवानग्या दिल्या नाहीत. दुसरीकडे वाडे धोकादायक असल्याने नागरिकांनी स्थलांतरित व्हावे किंवा वाडे पाडून टाकावे म्हणून नोटिसा बजावल्या जात आहेत. वाडे पाडा म्हणणे सोपे आहे, मात्र येथून स्थलांतरित होणाºया नागरिकांना अन्य भागातील भाडे कसे परवडेल याचा कोणताही विचार केला गेलेला नाही. मूळ मुद्दा बांधकामांचा आहे. अलीकडे पडलेले भालेराव वाडा किंवा अन्य अनेक वाडे पूररेषेतील होते आणि महापालिकेने त्यांना बांधकामाची परवानगी नाकारली आहे. आता हे वाडे पडू लागल्यानंतर केवळ वाडे मालक आणि धोकादायक स्थितीत राहणाऱ्यांना जबाबदार धरून काय होणार? पूररेषा आणि पुराची तीव्रता कमीच करायची नसेल तर किमान गोदाकाठच्या वाड्यांचा प्रश्न तरी सुटणे अशक्यच आहे.क्लस्टरसाठी वाडे शिल्लक राहतील?२००८ मध्ये आलेला महापूरच नव्हे तर महापालिकेत लोकप्रतिनिधींची राजवट आली तेव्हापासून गावठाण भागाच्या विकासासाठी योजना असावी आणि जादा चटई क्षेत्र द्यावे, अशी मागणी आहे. वाड्यांसाठी क्लस्टर योजनेची घोषणा होऊन दोन वर्षे उलटली, परंतु इतक्या संथ गतीने काम सुरू आहे की योजना प्रत्यक्ष येण्यासाठीदेखील काम झालेले नाही त्यामुळे क्लस्टरच प्रत्यक्ष प्रस्ताव येईपर्यंत वाडे तरी शिल्लक राहतील का असा प्रश्न केला जात आहे.
गावठाणातील वाड्यांच्या समस्याही कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2019 1:16 AM