नाशिक : महापालिकेचे उपलेखापाल तुकाराम सीताराम मोंढे यांच्याविरुद्ध कामकाजातील अनियमिततेबद्दल प्रशासनाने केलेली कारवाई रद्द करण्यासंबंधी मनसेच्या सत्ताकाळातील स्थायी समितीने दि. २२ सप्टेंबर २०१६ रोजी केलेला ठराव शासनाने अंतिमत: विखंडित केला आहे. त्यामुळे मोंढे यांना कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. उपलेखापाल तुकाराम मोंढे हे आॅगस्ट २०११ पासून लेखा विभागात कार्यरत आहेत. परंतु, कामातील हलगर्जीपणा व निष्काळजीपणा तसेच शासकीय कर्तव्य पार पाडण्यात कसूर केल्यामुळे दि. ३१ आॅक्टोबर २०१५ रोजी तत्कालीन मुख्यलेखाधिकारी यांनी त्यांच्या तीन वेतनवाढी बंद केल्या तसेच वारंवार गैरहजेरीबाबत थकीत वेतन काढण्यास मनाई केली. या कारवाईविरुद्ध मोंढे यांनी स्थायी समितीकडे अपील केले असता, स्थायी समितीने ठराव पारित करत त्यांच्यावरील शास्ती रद्द केली. स्थायीचा हा ठराव तत्कालीन आयुक्तांनी शासनाकडे आधी निलंबनासाठी आणि नंतर विखंडनासाठी पाठविला होता. त्यानुसार, शासनाने सदरचा ठराव अंतिमत: विखंडित केला आहे. त्यामुळे, तुकाराम मोंढे यांच्यावरील कारवाई कायम राहिली असून, त्यांना कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
उपलेखापालावरील कारवाई कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 1:26 AM