नाशिक : समग्र शिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना दरवर्षी शासनाकडून मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण केले जाते. मात्र, दरवर्षीच अभ्यासक्रम बदलत नसल्यामुळे जुन्या पुस्तकांचा पुनर्वापर करता येऊ शकतो. यासाठी शिक्षण विभागाने पालकांना विनंती केल्यानुसार जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये शाळास्तरावर मागीलवर्षीची सुस्थितीतील पुस्तके पालकांनी शाळेकडे परत करण्यास सुरुवात केली असून, ही पुस्तके शाळास्तरावर पालकांकडून स्वीकारून शिक्षक ग्रंथालयांमध्ये जमा करत आहेत. त्यामुळे बालभारतीकडे होणाऱ्या नवीन पुस्तकांच्या मागणीत आणि पर्यायाने छपाईच्या खर्चातही कपात होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. गतवर्षी नाशिक जिल्ह्यामध्ये ५ लाख १६ हजार ४८८ विद्यार्थ्यांना समग्र शिक्षण अभियानांतर्गत पुस्तकांचे संच मोफत वितरीत करण्यात आले होते. विशेष म्हणजे, पालकांनी समजूतदारपणा दाखवत पुस्तके जमा करतानाच जिल्ह्यातील अन्य पालकांनाही पुस्तके जमा करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी जनजागृती सुरू केेली आहे.
दरम्यान, कोरोनाच्या संकटामुळे प्राथमिक विभागाची शाळा वर्षभर भरलीच नाही. तर पाचवी ते आठवीपर्यंतची शाळा २७ जानेवारीपासून सुरू करण्यात आली. मात्र, त्यांचेही वर्ग काही दिवसच सुरू राहिले. त्यामुळे मार्गीलवर्षी विद्यार्थ्यांना वितरीत केलेल्या पुस्तकांचा पाहिजे तसा वापरच झाला नसल्याने पुस्तके जशीच्या तशीच होती. त्यामुळे शिक्षण विभागाने पालकांना गतवर्षींची पुस्तके परत करण्याची विनंती केली होती. त्यानुसार जिल्ह्यातील जवळपास ६ ते ७ हजार पालकांनी पुस्तके परत करून आपले कर्तव्य बजावले आहे. त्यामुळे यावर्षी शिक्षण विभागाकडून बालभारतीकडे पुस्तकांची केली जाणारी मागणी कमी होण्याचे संकेत आहेत.
--
--
अशी आहे आकडेवारी
मागीलवर्षी संच वाटप - ५,१६,४८८
यावर्षी अंदाजित मागणी - ४,६४,५७०
-- ग्रामीण भागात पालकांचा पुढाकार
पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची सुस्थितीतील पुस्तके परत मिळवून त्यांचा पुनर्वापर करण्याचा विचार पालकांनाही चांगलाच भावला आहे. त्यामुळे अनेक पालकांनी इतर पालकांच्या जनजागृतीसाठी पुढाकार घेऊन मागील वर्षातील सुस्थितीतील पुस्तके परत करण्यासाठी आवाहन करण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातून पालकांचा या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असून, विविध तालुक्यांमध्ये पालकांकडून शाळास्तरावर शिक्षकांकडे पुस्तके जमा होऊ लागली आहेत.
- पुस्तकांचा पुनर्वापर केल्यास मोठ्या प्रमाणात कागदाची बचत होणार असून, या माध्यमातून होणारा खर्चही वाचणार आहे. विशेष म्हणजे, पर्यावरण संवर्धनासाठी यातून हातभार लागू शकतो. पुस्तकांचा पुनर्वापर केल्यास कागदाची बचत होणार आहे.
---
आम्ही परत केली, तुम्ही कधी करणार
कोरोनामुळे शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांनी गतवर्षी पाठ्यपुस्तकांचा फारसा वापर केलेला नाही. त्यामुळे बहुतांश विद्यार्थ्यांची पुस्तके सुस्थितीत आहेत. ती परत केली तर पुढील वर्षी शासनाला पुस्तकांवरील खर्च अन्य शैक्षणिक विकासासाठी करता येईल. त्यामुळे सर्वच पालकांनी जबाबदारी स्वीकारून चांगली पुस्तके परत करायला हवीत.
- यशवंत जाधव, पालक
---
विद्यार्थ्यांना शाळेतच पाठ्यपुस्तके मिळत असल्याने आर्थिक दुर्बल घटकातील पालकांना दिलासा मिळतो. त्यामुळे सर्वच पालकांनी त्यांच्या मुलांनी वापरलेली सुस्थितीतील पुस्तके शाळेकडे परत जमा करायला हवी. पुस्तके जमा करणाऱ्या पालकांनी आपल्या आजूबाजूच्या पालकांनाही यासाठी प्रवृत्त करणे आवश्यक आहे.
- सुभाष कदम, पालक
--
कोट-
शाळास्तरावर शिक्षकांकडून प्रक्रिया
शासनाच्या निर्देशानुसार ज्या विद्यार्थ्यांची पुस्तके सुस्थितीत आहेत, त्यांची पुस्तके शाळास्तरावरील ग्रंथालयांमध्ये जमा करण्याची प्रक्रिया स्थानिक शिक्षकांकडून सुरू आहे. याविषयीचा एकत्रित अहवाल अद्याप प्राप्त नाही. मात्र, पालकांचा पुस्तके जमा करण्यासाठी चांगला प्रतिसाद मिळत आहे.
- राजीव म्हसकर, शिक्षणाधिकारी
--
--
जिल्ह्यातील विद्यार्थी संख्या
पहिली - १,१७,०४५
दुसरी - १,२१,३४२
तिसरी - १,२०,६१८
चौथी - १,२३,९३९
पाचवी - १,२२,७४३
सहावी - १,२०,६४५
सातवी - १,१८,३३२
आठवी - १,१५,९१०