मालेगाव : मालेगावी वस्रोद्योगात प्रोसेसिंग हब तयार केल्यामुळे येथील कच्च्या मालावर येथेच प्रक्रिया होईल. स्थानिक स्तरावर प्रक्रिया उद्योग झाल्यामुळे मालेगावातच नवीन रेडिमेड गारमेंट इंडस्ट्री व त्यावर आधारित इतर अनेक छोटे-मोठे उद्योगांची उभारणी होण्यास मदत होईल. त्यातून प्रत्यक्षात किमान २० ते २५ हजार व अप्रत्यक्ष किमान लाखजणांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.मालेगावच्या औद्योगिक विकासाला चालना देणाऱ्या या उद्योगाच्या यशस्वीतेसाठी पुरेसा वीज व पाणीपुरवठा उपलब्ध करण्याची जबाबदारी जशी शासनाची आहे तसेच याबाबतचा पूर्वीचा अनुभव लक्षात घेता उद्योग उभारणीसाठी ‘धार्मिक कारण’ आड येऊ न देण्याची जबाबदारी स्थानिक उद्योजकांची आहे.हाळवणकर समितीने सुचविलेल्या शिफारसीनुसार येथे ‘प्रोसेसिंग हब’ सुरू केल्यास येथील यंत्रमाग व्यवसायासाला व शहरातील औद्योगिक जगताला नवीन ऊर्जितावस्था प्राप्त होईल.साधारण सात लाख लोकसंख्या असलेले मालेगाव शहर यंत्रमाग व हातमागासाठी प्रसिद्ध आहे. यंत्रमाग व हातमाग व्यवसाय शहराच्या अर्थव्यवस्थेची मुख्य नाडी आहे. येथे जवळपास दीड लक्ष यंत्रमाग असून, त्यावर प्रत्यक्षात जवळपास एक लक्ष कामगार व पूरक व्यवसायावर साधारण पाच लक्ष लोकसंख्येचा रोजगार अवलंबून आहे. शहरात एका यंत्रमागावर एका दिवसाला साधारण ६० ते ८० मीटर कापडाचे उत्पादन होत असते. प्रामुख्याने रंगीत साडी, पॉलिस्टर कापड, सफेट कॉटन व पॉलिस्टर कॉटन या चार प्रकारच्या कापडाची येथे निर्मिती होत असते. त्यातही प्रामुख्याने सफेट कॉटन अर्थात ग्रे कॉटन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कापडाचे उत्पादन हे सर्वाधिक आहे. या कापडाची निर्मिती झाल्यानंतर ते पुढील प्रक्रियेसाठी पाली व बालोत्रा (राजस्थान), सुरत व अहमदाबाद (गुजरात) व डोंबिवली अशा पाच ठिकाणच्या बाजारपेठेत जात असते. मालेगावी वस्त्रोद्योगात प्रोसेसिंग हब तयार केल्यामुळे येथील कच्च्या मालावर येथेच प्रक्रिया होईल. परिणामी राजस्थान व गुजरातमध्ये प्रक्रियेसाठी पाठविण्यात येणाऱ्या मालावरील खर्चात व वेळेत बचत होईल. स्थानिक स्तरावर प्रक्रिया उद्योग झाल्यामुळे येथे अधिक कापडाची निर्मिती होऊ शकेल, त्याचा खर्च कमी राहील. अनेक छोटे-मोठे उद्योगांची उभारणी होण्यास मदत होईल. त्यातून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष किमान लाख जणांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो. त्यामुळेच मालेगावी ‘प्रोसेसिंंग हब’ तयार करण्याच्या हाळवणकर समितीच्या प्रस्तावाचे येथील राजकीय व औद्योगिक क्षेत्रात स्वागत केले जात आहे. मालेगावी प्रोसेंसिंग हब तयार करण्याची काही उद्योजकांची जुनी मागणी होती. मध्यंतरी कधी शासनाच्या उदासीनतेमुळे तर कधी काही व्यावसायिकांनी उपस्थित केलेल्या धार्मिक कारणाने येथे प्रत्यक्षात ‘प्रोसेसिंग हब’ अस्तित्वात येऊ शकला नाही. मुस्लीम धर्मात व्याज देणे वा घेणे ‘हराम निषेधार्ह’ आहे. त्यामुळे या उद्योगासाठी आवश्यक ती सबसिडी संबंधित बॅँकांच्या व्याजपद्धतीच्या प्रक्रियेद्वारा घेण्यास त्यावेळी काही उद्योजकांनी विरोध केल्यामुळे शासनाने पुढाकार घेऊनही ही योजना बारगळली होती.(प्रतिनिधी)
प्रोसेसिंग हब : शासना, उद्योजकांचे हवे सहकार्य; राजस्थान, गुजरातमध्ये जाणाऱ्या मालावर प्रक्रिया शक्य
By admin | Published: January 31, 2015 11:26 PM