नाशिक : ‘पवनपुत्र हनुमान की जय’, ‘जय श्रीराम’ असा जयघोष करत शुक्रवारी (दि. ३१) शहरात सर्वत्र पारंपरिक पद्धतीने आणि भक्तिमय वातावरणात हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त जुने नाशिक परिसरातून मिरवणूक काढण्यात आली.श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणूकीत स्वामी सागरानंद सरस्वती महाराज, महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती महाराज, श्री सिद्धेश्वरानंद सरस्वती महाराज, सुदर्शनानंद महाराज, शंकरानंद महाराज, विश्वनाथनंद महाराज, केशवानंद सरस्वती, गिरीजानंद सरस्वती, विक्रम नागरे, दिंगेबर मोगरे, अंकुश पवार, पिंटू शिळे, नितीन थेटे, दीपक गवळी, अमोल कोल्हे आदी सहभागी झाले होते़शहरातील विविध हनुमान मंदिरांमध्ये पहाटेपासूनच कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. सूर्याेदयावेळी कीर्तनाची सांगता झाल्यानंतर हनुमान जन्मसोहळा पार पडला.उंटवाडीरोड येथील दक्षिणमुखी मारुती, त्र्यंबकरोड येथील वेदमंदिर, पंचवटीतील दुतोंड्या मारुती यांसह आगर टाकळी येथील मारुती देवस्थान, त्र्यंबकेश्वर येथील अंजनेरी डोंगरावरही हनुमान जयंती साजरी करण्यात आली. पंचवटी, पवननगर, सिडको, सातपूर, गंगापूररोड, मेरी, नाशिकरोड येथे मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी होती. आदी ठिकाणच्या हनुमान मंदिरे, मंडळे, संस्थांमध्ये पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.सूर्याेदयानंतर हनुमानाचा जन्मसोहळा झाल्यावर फटाक्यांची आतषबाजी करून तसेच पारंपरिक वाद्ये वाजवून जल्लोष करण्यात आला.पहाटे ५ वाजता आरती, हनुमान जन्मसोहळा, सकाळी ८ वाजता सत्यनारायण पूजा करण्यात आली. अनेक मंदिरांमध्ये सामूहिक मारुतीस्तोत्र पठण, हनुमान चालिसा पठण आणि सुंदरकांड आख्यानाचेदेखील आयोजन करण्यात आले होते.सातपूर परिसरातील हनुमान मंदिरांत विविध धार्मिक उपक्र म राबवून हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सप्ताहात दररोज सकाळी ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी प्रवचन, सायंकाळी कीर्तन, हरिपाठ आदी विविध धार्मिक कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले होते. त्याचप्रमाणे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. पंचवटी येथील परिसरातील ठिकठिकाणच्या हनुमान मंदिरांमध्ये हनुमान जयंतीचे औचित्य साधून हनुमान पालखी, हनुमान जन्मोत्सव, पूजा, अभिषेक, महाप्रसाद वाटप आदींसह विविध धार्मिक कार्यक्र म झाले. हनुमान जयंतीचे औचित्य साधून शेकडो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला.जुना आडगाव नाक्यावरील पंचमुखी हनुमान मंदिरात हनुमान जयंतीनिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्र म झाले. पहाटे महाअभिषेक करण्यात आल्यानंतर हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला. महाआरतीनंतर दिवसभर भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. सकाळी १०८ सामूहिक हनुमान चालिसा पठण, सुंदरकांड हवन तर दुपारी पूर्णाहुती करण्यात आली. सायंकाळी पुष्पांजली महिला मंडळाने संगीत सुंदरकांड पठण सादर केले. हनुमान जयंतीनिमित्त पंचमुखी हनुमान मंदिरात विविध आखाड्यांचे साधू, महंत तसेच भाविकांनी दर्शन व मसाले भात, बुंदीचे लाडू महाप्रसादाचा लाभ घेतला. मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली होती.श्री पंचमुखी हनुमान मंदिरात पहाटे महाअभिषेक, सकाळी हनुमान जन्मोत्सव व महाआरती, दुपारी महाप्रसाद आदी कार्यक्रम पार पडले. हनुमान जयंतीनिमित्त गंगापूररोड दक्षिण हनुमान मंदिर येथे काल्याचे कीर्तनाने आज सांगता झाली. तसेच श्रमिकनगर येथील महारु द्र हनुमान मंदिरातही विविध कार्यक्रम पार पडले. यावेळी परिसरातील नागरिक उपस्थित होते.
हनुमान जयंतीनिमित्त शहरातून मिरवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 11:55 PM