इंदिरानगर : अंगावर पावसाच्या सरी झेलत ‘जय जगन्नाथ, जय जगन्नाथ’चा जयघोष आणि टाळ-मृदंग, ढोल-ताशाच्या गजरात इंदिरानगर परिसरात शनिवारी भगवान श्री जगन्नाथ यांच्या रथाची मिरवणूक काढण्यात आली.कलिंग सांस्कृतिक समाज यांच्या वतीने सालाबादप्रमाणे समर्थनगर येथील श्री जगन्नाथ मंदिरापासून मिरवणूक रथास देवानंद बिरारी यांनी श्रीफळ वाढवून सुरुवात केली. समर्थनगर बस थांबा, कैलासनगर बस थांबा, राजे छत्रपती चौक, सावरकर चौक, बापू बंगला मार्गे वडाळा-पाथर्डी रस्त्याने मोदकेश्वर मंदिर येथे मिरवणुकीचा समारोप झाला. रथाच्या अग्रस्थानी टाळ-मृदंगाच्या तालावर ‘जय जगन्नाथ, जय जगन्नाथ’च्या जयघोषात तल्लीन होऊन भाविक नाचत होते. रथामध्ये श्री जगन्नाथ, बलभद्र, सुभद्रा व सुदर्शन यांच्या प्रतिमा ठेवण्यात आल्या होत्या. जगन्नाथ मंदिरातून श्री जगन्नाथ यांचे सर्व भाविकांना दर्शन व्हावे म्हणून नऊ दिवस मावशीच्या घरी म्हणजे मोदकेश्वर मंदिर येथे मुक्काम असतो त्यानंतर मिरवणूक काढून जगन्नाथ मंदिरात त्या आणल्या जातात. मिरवणुकीत कॅप्टन बारी, ए. के. पंड्या, अरुण सुबोध, अरुण मुनशेट्टीवार यांच्यासह ओडिशा येथील भाविक सहभागी झाले होते.
जगन्नाथ रथाची मिरवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2018 1:07 AM