देवळाली कॅम्प : इराक देशातील करबलाच्या मैदानावर हजरत मुहम्मद पैगंबर यांचे नातू हजरत इमाम हुसेन हे यजीद (शत्रू) यांच्याशी लढतांना शहीद झाले त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मुहर्रम सणानिमित्त मस्जिदमध्ये नमाज पठण करून परिसरातून ताजियाची मिरवणूक काढण्यात आली होती. देवळालीत हैदरखान उस्मानखान, रईसखान उस्मानखान, मुजमिल खान यांचा १ चांदीचा ताजिया, तर शेख अब्दुल सत्तार यांच्या पिढीचा लाकडी ताजिया आहे. तर १२ इमाम ही मानाची मुख्य सवारी असलेली चांदीची सवारी आहे. यांसह शहराच्या विविध भागांत हिंदू-मुस्लीम बांधवांच्या १४ सवारी स्थापन करण्यात आल्या असून, मुहर्रमनिमित्त दहा दिवस येथील मस्जिदमधून करबलाच्या लढाईचे वर्णन असलेल्या ग्रंथाचे वाचन करण्यात आले. स्थापन केलेल्या ताबूत (ताजिया)मध्ये दहा दिवस मुस्लीम बांधवांनी रोट (नानकटाई), खिचडा, चोंगे, भाजी आदींचा नैवेद्य ताजियास अर्पण केला. मुहर्रम सणाच्या दिवशी सकाळी झालेल्या नमाजमध्ये मानव जातीच्या कल्याणासाठी दुवा पठण करण्यात आले, तर महिलांनी घरोघरी धार्मिक ग्रंथांचे वाचन केले. युवकांच्या वतीने मस्जिदीबाहेर दिवसभर दूध, शरबत वाटप करण्यात आले.
देवळाली कॅम्प येथे मुहर्रमनिमित्त मिरवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 1:08 AM