नाशिक : गेल्या वर्षी कोपर्डी येथील अमानुष अत्याचाराच्या घटनेतील आरोपींना फाशीच्या शिक्षेच्या मागणीसह मराठा समाजाच्या अन्य मागण्यांसाठी मुंबईत ९ आॅगस्ट रोजी क्रांतीदिनी राज्यस्तरीय मराठा क्रांती मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाच्या माध्यमातून मराठा समाजाच्या मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी संपूर्ण राज्यभरातून २१० सदस्यांची पाठपुरावा समिती स्थापन करण्यात आली आहे. नाशिक जिल्हा मराठा क्रांती मोर्चातर्फे बुधवारी (दि.२) पत्रकार परिषदेच्या माध्यमातून या पाठपुरावा समितीची घोषणा करण्यात आली.कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर अमानुष अत्याचार करून तिच्या हत्येच्या घटनेला एक वर्षाचा कालावधी उलटूनही आरोपींना शिक्षा झालेली नाही. या घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा मिळावी, या मागणीसाठी मराठा समाज एकवटला असून, राज्यभरात वेगवेगळ्या जिल्ह्णांमधून ५७ मराठा क्रांती मूक मोर्चे काढल्यानंतरही कोपर्डीच्या आरोपींना शिक्षा झालेली नाही. तसेच मराठा समाजाच्या अन्य मागण्याही प्रलंबितच आहेत. त्यामुळे मराठा समाजात सरकारच्या विरोधात असलेली प्रचंड नाराजी व असंतोष धुमसत असून, मुंबईतील मराठा मूक क्रांती मोर्चाच्या माध्यमातून मराठा समाज सरकारप्रती रोष व्यक्त करण्याचा निर्धार मराठा समाजाने केला आहे. या मोर्चाच्या माध्यमातून कोपर्डीतील आरोपींना फाशीची शिक्षा, मराठा समाजाला आरक्षण, अॅट्रॉसिटी कायद्यात दुरुस्ती, शेतकºयांची संपूर्ण कर्जमुक्ती व शेतीमालास हमीभाव आदी २० मागण्यांसाठी मुंबईत ९ आॅगस्टला क्रांतीदिनी राज्यस्तरीय मराठा क्रांती मूक मोर्चा काढण्यात येणार आहे.या मोर्चासाठी व पुढील दिशा ठरविण्यासाठी राज्यस्तरीय पाठपुरावा समिती स्थापन करण्यात आली असून, या समितीत नाशिकचे चंद्रकांत बनकर, शरद तुंगार, योगेश नाटकर, सोमनाथ जाधव, विलास पांगरकर व माधवी पाटील यांच्यासह राज्यभरातील २१० सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे. या पाठपुरावा समितीत राज्यस्तरीय तज्ज्ञ व समन्वय समितीच्या सदस्यांचाही समावेश आहे. या समितीची यादी बुधवारीच इ मेलद्वारे राज्यपाल, मुख्यमंत्री व महसूलमंत्री यांना पाठविण्यात आल्याची माहिती नाशिक मराठा क्रांती मोर्चा समन्वय समितीनेदिली. दरम्यान, सरकारने मराठा समाजाच्या मागण्यांबाबत त्वरित निर्णायक पाऊल उचलावे, अन्यथा ९ आॅगस्टला क्रांतीदिनी मुंबईतील मराठा क्रांती मोर्चात सरकारला मराठा समाजाच्या असंतोषास सामोरे जावे लागेल, असा इशाराही पत्रकार परिषदेतून देण्यात आला. यावेळी राज्यस्तरीय पाठपुरावा समितीतील नाशिकच्या सदस्यांसह मराठा समाजातील विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.तज्ज्ञ, समन्वय समितीमराठा क्रांती मोर्चातर्फे जाहीर करण्यात आलेल्या २१० सदस्यीय पाठपुरावा समितीत राज्यस्तरीय तज्ज्ञ व समन्वय समितीचाही समावेश आहे. या समितीत मुख्य मार्गदर्शक साताºयाचे खासदार उदयनराजे भोसले व राज्यसभेचे खासदार संभाजीराजे भोसले यांच्यासह जयसिंगराव पवार, पुरुषोत्तम खेडेकर, सुधीर सावंत, रघुनाथ दादा पाटील, बुधाजीराव मुळीक, प्रकाश पोहरे, शशिकांत पवार, प्रतापसिंह जाधव, राजेंद्र कोंढरे, संजीव भोर, करण गायकर, गणेश कदम, नानासाहेब जावळे, किशोर चव्हाण, चंद्रकांत बºहट, दिलीप पाटील, प्रा. एम. एम. तांबे यांचा समावेश आहे.
मराठा क्रांती मोर्चा पाठपुरावा समितीची घोषणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2017 11:45 PM