खडकी : अन्य पिकांच्या तुलनेत शेतकऱ्यांना कांदा उत्पादन परवडत असले तरी त्यातून मिळणारा भाव हा साठवणूक केलेला कांद्याला मिळत आहे. कारण लाल कांद्याचेही उत्पादन कमी असल्याने त्याचा बाजारभाव स्थिर नसतो. स्थिर बाजारभावासाठी शेतकऱ्यांना योग्य त्या योजनेचा वापर करून किंवा त्याच्या चाळीतच हमीभावाने कांदा खरेदी करून शेतकऱ्यांना लाभ द्यावा, अशी मागणी कांदा उत्पादकांकडून केली जात आहे.
कृषी विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या कांदा चाळ उभारणीसाठीचा निधी उभारणीअगोदर मिळाल्यास त्याचा आधार शेतकऱ्यांना होणार आहे. शेतकऱ्यांना कांदा चाळ उभारणीसाठी प्रोत्साहननिधी ३ हजार ५०० रुपये टन याप्रमाणे २५ टन कांदा साठवणुकीसाठी ८७ हजार पाचशे रुपये निधी दिला जातो. मात्र, हा निधी हा कांदाचाळ उभारणी केल्यानंतर दिला जात असल्याने शेतकऱ्यांना स्वतःच्या पैशांतून कांदा चाळ उभारणी करावी लागत आहे. आर्थिक दुर्बल किंवा अल्पभूधारक अत्यल्प भूधारक शेतकऱ्याकडे एवढी मोठी रक्कम नसल्याने कांदाचाळ उभारणी सुरुवातीचा खर्च होत नसल्याने कांदा चाळ बऱ्याच शेतकऱ्यांनी निधीअभावी नाकारली आहे. यादृष्टीने धावते रक्कम या अनुषंगाने टप्प्या-टप्प्याने कांदाचाळ उभारणी करत असताना शेतकऱ्यांना या रकमेची अदा करणे गरजेचे आहे.
कृषी विभागाने निश्चित केलेल्या कांदाचाळी तांत्रिकदृष्ट्या पूर्णत: सफल नसल्याने माळमाथ्यासारख्या भागात अती उष्णतेचा परिणाम होऊन कांदा चाळीतील कांदा सोडून खराब होतो. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागतो. कारण हा कांदा हा खराब होईल यामुळे कमी भावात विकावा लागत आहे. यादृष्टीने सदर चाळी वातानुकुलितदृष्ट्या कशी निर्माण करता येईल याविषयी संशोधन करून कृषी विभागाने कांदाचाळीचे नियोजन करावे अन्यथा कांदाचाळीची दिलेले अनुदानही शेतकऱ्यांना फारसे लाभदायक ठरणार नाही.
मालेगाव, बागलाण तालुक्यात उन्हाळ कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन केले जाते. मात्र त्यादृष्टीने उत्पादन करता क्षणी उत्पादनाला कमी भाव असतो. त्यामुळे कांदा साठवून ठेवण्याची तरतूद शासन व शेतकऱ्यांनी केली आहे. मात्र, इतर धान्याच्या वेअरहाऊस किंवा आदी वातानुकूलित गोदामे धान्याला सुरक्षित ठेवू शकतो. त्याप्रमाणात कांदाचाळीची रचना अतिशय साध्या पद्धतीने असलेले वातावरण वातानुकूलित नसल्याने शेतकऱ्यांना कांदा साठवणीत सोयीचे असले तरी ते फारसे लाभदायक नाही.
आजच्या घडीला कांद्याचे भाव पंधराशेवर स्थिर झाले आहे .उत्पादनाचे घट बघता शेतकऱ्यांना दर परवडणारे नाहीत. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी कांद्याचे भाव वाढलेले नाही. कांदा साठवून ठेवूनही फार मोठा लाभ झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता लाल कांद्याच्या लागवडीकडे लक्ष घातले आहे. मात्र, पावसाने झडी लावल्याने कांद्याची रोपे व लावलेली कांदे ही खराब होत आहेत. त्यामुळे कांद्याच्या ऋतूत कांदा कमी प्रमाणात येऊन भाव वाढण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.
इन्फो...
मोठ्या चाळींची आवश्यकता
कांदा चाळ उभारणीचा प्रकल्प शेतकऱ्यांच्या दृष्टीने लाभदायी असला तरी तो परिपूर्णता यशस्वी करण्यासाठी त्यातील थोडे दोषांमध्ये तांत्रिकदृष्ट्या बदल करून कांदा चाळ उभारणी गरजेचे आहे. शेतकरी स्वतःच्या शेतात एकदम साध्या पद्धतीने कांदा चाळ उभारतो. त्यात चाळीतील कांदा मोठ्या प्रमाणात सडत नसून नुकसान कमी होते. शेतकरी लाकूड तसेच उसाचे पाचट किंवा बॅनर आधी पद्धतीने कांदाचाळीची उभारणी करतो. त्या चाळीतील कांदा कुठल्याही दृष्टीने खराब होत नाही. मात्र, त्याची धारण क्षमता कमी असल्याने या चाळीमधील कांदा ५० ते १०० क्विंटल पेक्षा जास्त साठवू शकत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या चाळींची आवश्यकता पडत आहे.