मानोरी : दुधाचे दर घसरल्याने खर्चही वसूल होत नसल्याने उत्पादकांमधून चिंता व्यक्त होत आहे. दूध दरवाढीसाठी अनेकदा आंदोलने करूनही दुधाला योग्य दर मिळत नसल्याने दुग्ध व्यवसाय धोक्यात आला आहे.ग्रामीण भागात शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय करण्यास शेतकरी पसंती देतात. मात्र, सध्या दुधाचे दर प्रतिलिटर १८ ते २०रुपये असा नीचांकी दर मिळत असल्याने दूध व्यवसाय करणे अवघड बनले आहे. अनेक वर्षांपासून दुधाच्या दरात सातत्याने घसरण होत असल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. सध्या मिळत असलेल्या दरात दूध उत्पादन खर्च भरून निघणे कठीण झाले असून ‘दूध स्वस्त, पाणी महाग’ अशी स्थिती निर्माण झाली आहे. दुग्ध व्यवसाय टिकवण्यासाठी शेतकरी शेतात जेमतेम पाण्यावर जनावरांसाठी घास, हिरवे गवत, मका आदी चारा तयार करीत आहेत. यासाठी खर्च करूनही दुधाचे दर जैसे थेच आहेत. दूधवाढीसाठी अनेक प्रकारची औषधे, ढेप, सरकीसारख्या खाद्यवस्तू खरेदी कराव्या लागतात. ढेपच्या पन्नास किलो पोत्याच्या दर सध्या बाराशे ते तेराशे रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. एका गायीला ढेपचे एक पोते साधारण बारा ते पंधरा दिवस जाते. त्यात जनावरांचा दवाखाना व इतर खर्च विचारात घेता दुग्ध व्यवसाय धोक्यात आला आहे.
दुधाला प्रतिलिटर ३० रुपयांच्या पुढे दर मिळणे गरजेचे असून, अनेक दिवसांपासून दुधाच्या दरात सातत्याने घसरण होत असल्याने खर्चदेखील फिटत नाही. हीच परिस्थिती पुढे कायम राहिली तर शेतकऱ्यांना दूध नक्कीच रस्त्यावर ओतल्याशिवाय पर्याय राहणार नाही. दुधासह शेतमालाला चांगल्या प्रमाणात दर मिळाला पाहिजे.- विठ्ठल वावधाने, दूध उत्पादक शेतकरी, मानोरी बुद्रुक