सोयगाव (सचिन देशमुख) : माळमाथ्यावरील देवारपाडे या गावातील कमलेश नानासाहेब घुमरे या युवा शेतकऱ्याने प्रयोगशील दृष्टिकोन ठेवत पारंपरिक शेती पद्धतीला फाटा देण्याचा प्रयत्न केला आहे. वडिलांबरोबर शेतात काम करत असताना त्याला वडिलांचे कष्ट कसे कमी करता येतील? या विचाराने स्वस्थ बसू दिले नाही. मग प्रयोगशीलतेतून त्याने देशी जुगाड करत शेतीसाठी बहुएपयोगी यंत्रे बनवायला सुरुवात केली. त्यासाठी टाकाऊ वस्तूंचा उपयोग करून कमी खर्चात दर्जेदार व वजनाने हलके यंत्रे तयार करण्याचा मानस केला. दोन वर्षांपूर्वी त्याने पहिले यंत्र बनविले. यासाठी त्याने भंगारातील तीन चाकी सायकल व अन्य काही साहित्य वापरले. नांगरणी, पेरणी, कोळपणी आणि फवारणी अशी चारही कामे एकाच यंत्राने साध्य होतात, शिवाय या यंत्राच्या मदतीने कामे कमी वेळात होतात. यामुळे कमी श्रमात अधिकाधिक काम करता येणे शक्य झाले. त्याच्या या यंत्राची दखल त्यावेळी कॉलेजपासून ते विद्यापीठापर्यंत घेतली गेली. तसेच चित्रवाहिन्यांनी, माध्यमांनी देखील या युवा शेतकऱ्याच्या कामाचे कौतुक केले. अनेक कंपन्यांनी या तंत्राविषयी विचारणादेखील केली. (कमलेश घुमरे, मालेगाव)
-----------------------------
भंगारातील वस्तूपासून कपाशी, मका लागवड यंत्रभंगारातील वस्तूपासून कपाशी, मका लागवड यंत्र
आता या महिन्यात त्याने दुसरा शेतीपयोगी यंत्राविष्कार केला. कमी खर्चात, वजनाला हलके व बनवायला सहजसोपे यंत्र. यासाठी एक दोन फुटाचा पाइप, कपाशी बी टाकण्यासाठी पाण्याची रिकामी बाटली, वायर इत्यादी. प्रत्येक शेतकऱ्याकडे हे साहित्य उपलब्ध असते. त्यामुळे कोणीही हे यंत्र सहज बनवू शकतो. कपाशी, मका लागवड करत असताना पाठदुखी, कंबर, गुडघेदुखी हा त्रास जाणवत असतो; परंतु या यंत्राविष्कारामुळे या त्रासापासून मुक्तता मिळते. शिवाय कामाचा वेग वाढीस लागून कमी कष्टात काम साध्य होते. एवढ्यावरच न थांबता त्याने वेल्डिंग कलाही यूट्यूबच्या साह्याने शिकून अवगत केली आहे. त्याचेच उत्तम उदाहरण म्हणजे त्याने मॉडीफाइड केलेला ट्रॅक्टर. शेतात काम करत असताना ऊन, वारा, पाऊस यांच्यापासून बचाव होईल अशा पद्धतीने ट्रॅक्टर बनवला आहे. त्याचे बनवलेले ट्रॅक्टर पाहण्यासाठी मार्केट परिसरात लोक गर्दी करतात. त्याला या कामात पुतण्या विजय घुमरे हा मदत करत असतो. मालेगावातील लघुपटात देखील त्याने अनेक भूमिका साकारल्या आहेत. आई-वडील, पत्नी यांची कायम समर्थ साथ असल्यामुळे हे शक्य झाले, असे कमलेश अभिमानाने सांगतो.
---------------------------
शिक्षण फक्त नोकरी मिळण्यासाठीच केले पाहिजे, असे काही नाही. आपण शिक्षण उपयोगात आणले पाहिजे. आधुनिक भारतात शेतकरीदेखील आधुनिक झाला पाहिजे. माझ्या शेतकरी माय-बापाचे हाल कसे कमी करता येतील, याच विचाराने मी हे यंत्राविष्कार केले.
-कमलेश घुमरे, देवारपाडे
===Photopath===
280621\28nsk_3_28062021_13.jpg
===Caption===
कमलेश घुमरे, मालेगाव