--
शासनाने ज्या प्रमाणे कोरोना बाधितांचे प्रमाण कमी असलेल्या गावांमध्ये स्थानिक प्रशासनाच्या सल्ल्याने शाळा सुरू करण्यास परवानी दिली आहे, याच धर्तीवर गत १५ महिन्यांपासून बंद असलेल्या शिकवणी वर्गांनासुद्धा आठवी ते बारावीच्या मोठ्या विद्यार्थ्यांचे क्लासेस, सर्व अटीशर्तींसह, कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून कमी विद्यार्थी संख्येने घेण्यास परवानगी देण्याची गरज नाशिक जिल्हा कोचिंग क्लासेस संचालक संघटनेचे अध्यक्ष जयंत मुळे यांनी व्यक्त केली आहे.
सध्या ऑनलाईन शिक्षण जरी सुरू असले तरी त्यात विषय नीटपणे समजण्यात अनेक अडचणी येत आहेत. विद्यार्थ्यांचा प्रतिसादही खूप कमी आहे. नेटवर्कची समस्या, विद्यार्थ्यांची एकाग्रता, वेळेची कमतरता, घरातील वातावरण, शाळा-कॉलेजच्या शिक्षकांच्या लेक्चर्सचा भडीमार यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण कंटाळवाणे व रटाळ झाले आहे. केव्हा एकदा वर्गात बसून पद्धतशीरपणे विविध विषयांमधील समस्या सोडवून संकल्पना सविस्तरपणे समजावून घेतो, अशी घाई विद्यार्थ्यांना झाली आहे. विषयांच्या मूळ संकल्पनाच नीटशा आत्मसात करण्यासाठी ते धडपडत आहेत. छोट्या व मध्यम क्लासेसचालकांकडे विद्यार्थी व पालकांकडून सातत्याने क्लास सुरू करण्याची मागणीही करीत आहेत. क्लासचे शिक्षक विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करतात. परंतु, अशाप्रकारे एकएक विद्यार्थ्याचे प्रश्न सोडविण्यासाठी वेळही पुरत नाही. त्यामुळे लवकरच ऑफलाईन क्लासेस सुरू करावेत, अशी मागणी होत आहे. पण शासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे व परिस्थितीचे गांभीर्य राजकारण्यांना न कळाल्याने ही समस्या अधिकाधिक गंभीर होत चालली असल्याचे त्यांनी नमूद केले.
कोरोना संकटामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा झाला आहे. एकीकडे अशी परिस्थिती असताना दुसरीकडे कोचिंग क्लासेस संचालकही प्रचंड मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत. गेल्या वर्षभरात जवळची जमापुंजी संपली आहे. अनेक क्लासेस संचालकांनी त्यांच्या भाड्याच्या जागा सोडल्या आहेत तर काहींचे कर्जाचे हप्ते थकले आहेत. महागाईने हैराण झालेल्या या क्लाससंचालकांना कोणताही दुसरा आर्थिक स्रोत नसल्याने त्यांची कुचंबना होत आहे. त्यामुळे सरकारने किमान १५ ते २० विद्यार्थ्यांचे का होईना क्लासेस घ्यायला परवानगी द्यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
060721\06nsk_15_06072021_13.jpg
शाळा-महाविद्यालयांबरोबर व्यावसायिक क्लासेसलाही परवानगी मिळावी - जयंत मुळे, अध्यक्ष, नाशिक जिल्हा कोचिंग क्लासेस संचालक संघटना