येवला : पालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने चार दिवसांत वर्षानुवर्षे मुख्य रस्ता गिळंकृत केलेल्या अतिक्रमणांवर कारवाई केली. यात सुमारे २५० पेक्षा जास्त अतिक्रमणे हटविली आहेत. शहराच्या अन्य भागात ही मोहीम कधी सुरू होईल, हे सांगता येत नाही. अचानकपणे मोहिमेचे नियोजन होऊन अतिक्रमणे हटवली जातील अशी चर्चा आहे.दरम्यान, शहरातील नागडदरवाजा भागात पालिका मुख्याधिकारी संगीता नांदूरकर यांनी पायी फिरून अतिक्रमणे काढून घ्या, अशी विनंती व्यावसायिकांना केली. याला प्रतिसाद म्हणून माजी नगरसेवक रिजवान शेख यांनी प्रथम आपले अतिक्रमण काढून घेतले. दरम्यान, रविवारी रात्री अनेकांनी नागडदरवाजा नाक्यापर्यंत असलेली आपापली अनधिकृत बांधकामे काढून घेतल्याने परिसराने मोकळा श्वास घेतला. प्रशासनाच्या या ठोस कारवाईमुळे शहरातील मध्यवस्तीने खऱ्या अर्थाने मोकळा श्वास घेतला आहे. शहरातील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अनधिकृत अतिक्रमणे झाली होती. प्रशासनाने वेळोवेळी संबंधितांना नोटिसाही बजावल्या; याकडे काणाडोळा केला जात होता. आता मात्र स्वत:हून बांधकामे काढून घेत असल्याने शहर मोकळा श्वास घेईल, अशी आशा निर्माण झाली आहे.बेरोजगारांना जागा देण्याची मागणीकाही अतिक्र मणधारकांनी या कारवाईबाबत नाराजी व्यक्त करीत प्रशासनाने बेरोजगारांसाठी अन्यत्र जागा उपलब्ध करून देण्याची आवश्यकता व्यक्त केली. आता कोणत्याही क्षणी अतिक्र मण हटविण्याची मोहीम सुरू होऊ शकते या धास्तीने आपली अनधिकृत बांधकामे स्वत:हून काढलेली बरी अशी प्रतिक्रि याही व्यक्त होत आहे.
व्यावसायिकांनी स्वत:हून काढली अतिक्रमणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2018 1:25 AM