नाशिक : राज्यातील वरिष्ठ महाविद्यालयीनप्राध्यापकांचे वेतन गेल्या दोन महिन्यांपासून रखडले असताना वेतन कधी मिळणार याबाबतची ठोस माहितीही शिक्षण संचालकांकडून दिली जात नसल्याने प्राध्यापकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. मार्च एण्डमुळे विलंब होत असल्याचे यापूर्वी सांगण्यात आले होते, मात्र आता त्यानंतरही वेतनाबाबतची अनिश्चितता कायम असल्याने प्राध्यापकांना वेतनाची प्रतीक्षा आहे.अनुदानित महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या वेतनाची कार्यवाही सहायक शिक्षण संचालनालयाच्या कार्यालयातून केली जात असल्यामुळे शासनाच्या कारवाईवर बरेच काही अवलंबून असते. यंदा मार्च एण्डच्या कामांमुळे वेतनाला विलंब होण्याचे प्राध्यापकांना सांगण्यात आल्याने एप्रिलअखेर तरी वेतन मिळेल या आशेवर प्राध्यापकांना संपूर्ण एप्रिल महिन्यात वेतनाची प्रतीक्षा करावी लागली. त्यातच लोकसभा निवडणुकीची धामधूम असल्यामुळे शासकीय कामकाजांना काहीप्रमाणात मर्यादा आल्याच शिवाय मनुष्यबळाचाही प्रश्न निर्माण झाल्याने प्राध्यापकांनी प्राप्त परिस्थितीत लक्षात घेऊन वेतनाला होणारा विलंब लक्षात घेतला. मात्र आता मे महिन्यातही प्रतीक्षा करावी लागल्याने प्राध्यापकांमध्ये नाराजी आहे.महाविद्यालयीन प्राध्यापकांच्या वेतनाची प्रक्रिया ही आॅनलाइन पद्धतीने केली जात असल्याने प्राध्यापकांच्या खात्यात वेळेत वेतन जमा होते. परंतु यंदा मार्च एण्डमुळे विलंब झाल्याचे कारण पुढे करण्यात आले आणि त्यानंतर सातव्या वेतन आयोगाच्या नियमानुसार शासनाला वेतनाची निश्चिती करावी लागणार असल्यामुळे त्यास विलंब होत असल्याचे सांगितले गेले. मात्र याविषयी निश्चित कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. या संदर्भात शिक्षण सहसंचालकांशी संपर्क साधला असता त्यांनी येत्या दोन दिवसांत वेतन अदा होणार असल्याचे सांगितले.दरम्यान, वेतन अदा करण्याबाबत रखडलेल्या कारवाईला गती देण्यात आली असून, येत्या दोन दिवसात वेतन होण्याची शक्यता शासनाकडून वर्तविण्यात आली. नाशिक जिल्ह््यासह उत्तर महाराष्ट्रातील महाविद्यालयातील प्राध्यापकांचे एकाचवेळी वेतन अदा केले जाणार असल्याचेही समजते.विनाअनुदानितही वंचितअनुदानित महाविद्यालयातील प्राध्यापकांचे वेतन रखडले आहेच मात्र विनाअनुदानित प्राध्यापकांनादेखील गेल्या काही महिन्यांपासून वेतनापासून वंचित राहण्याची वेळ आलेली आहे. विनाअनुदानित प्राध्यापकांनादेखील गेल्या तीन ते चार महिन्यांपासून वेतन मिळालेले नसल्याची चर्चा आहे. शासनाकडून मिळणारे शिक्षकेतर अनुदान वेळेत मिळत नसल्याने या शिक्षकांचे वेतनही रखडविले जाते. आॅनलाइन शिष्यवृत्ती झाल्यापासून तर विनाअनुदानित प्राध्यापक अधिक अडचणीत आले आहेत.
प्राध्यापकांचे वेतन रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 12:59 AM