सतीश डोंगरे
नाशिक, दि. ३० : भाषा विषयाला विद्यार्थी मिळत नसल्यामुळे प्राध्यापकांची विद्यार्थी शोधताना चांगलीच दमछाक होत आहे. त्यासाठी प्राध्यापक विद्यार्थ्यांना भाषा विषयातील करिअरच्या संधींबाबतची माहिती देत आहेत. प्रवेशासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना प्राध्यापक मंडळी गाठुन त्यांना आपल्या विषयाला प्रवेश घ्या असे आवाहन करीत आहेत. यासाठी प्राध्यापकांकडून विविध फॉर्म्युले राबविले जात आहेत. त्यासाठी आपल्या आजी-माजी विद्यार्थ्यांना विद्यार्थी शोधण्यासाठी गळ घातली जात आहे. तसेच नात्यातील किंवा ओळखीच्या मंडळींकडे आपल्या पाल्याला भाषा विषयासाठी प्रवेश घेण्याबाबत सांगितले जात आहे. सध्या पद्वीची प्रवेश प्रक्रिया सुरू असून, प्राध्यापक विद्यार्थी मिळविण्यासाठी दिवसभर कॉलेजमध्येच ठाण मांडून बसत आहेत. नोट्स पुरविण्याचे आश्वासन‘फक्त प्रवेश निश्चित करा; वर्षभर नोट्स पुरविण्याची जबाबदारी आमची’ असे प्राध्यापकांकडून विद्यार्थ्यांना आश्वासन दिले जात आहे. पद्वीचा अभ्यासक्रम हा प्रामुख्याने नोट्सवर आधारित असल्याने विद्यार्थी ज्या विषयाला प्रवेश घेतात, त्या विषयाच्या नोट्स गोळा करण्याचे काम अगोदरच करतात. त्यातच त्यांना काहीही कष्ट न घेता, खुद्द प्राध्यापकांनीच तयार केलेल्या नोट्स दिल्या जात असल्याने प्रवेश घेण्याचा होकार तातडीने दिला जात आहे. यासाठी प्राध्यापकमंडळी स्वत:च नोट्स तयार करीत असल्याचेही समजते. कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांचा कोटा पुर्ण करण्याचे प्राध्यापकांसमोर आव्हान असल्याने ते नाना तऱ्हेचे फॉर्म्युले वापरत आहेत. परदेशी भाषा शिकण्याचा उद्देशआजच्या जागतिकीकरणाच्या या शर्यतीत परदेशी भाषा शिकणे यास अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. जर एखादी परदेशी कंपनी भारतात गुंतवणूक करण्यास उत्सुक असेल तर व्यवहारापुरती तरी परदेशी भाषा येणे महत्त्वाचे आहे. गेल्या दहा वर्षांपासून तरु ण मंडळी भारतीय भाषांव्यतिरिक्त फॉरेन लँग्वेजला सुद्धा तितकीच पसंती देतांना दिसतात. कारण या परकीय भाषांनी रोजगाराची नवीन दारे आपल्याला खुली करून दिली आहेत.खरंतर जगभरात अनेक भाषा बोलल्या जातात. पण जर्मन, फ्रेंच, जपानी, चीनी, रशियन या भाषा बोलणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे. आज सगळ्या तरु णाईच्या तोंडी असणारी इंग्रजी भाषा सुद्धा एक परदेशी भाषाच आहे, मात्र इंग्रजी भाषा गरज बनली आहे. तसेच नवीन भाषा म्हणजे एका नवीन ठिकाणाचा, तिथल्या संस्कृतीचा, जीवनमानाचा अभ्यासच होय, हा विचार विद्यार्थी करीत असल्याने परदेशी भाषा शिकण्याला प्राधान्य देत आहेत.