नाशिक : सतराव्या शतकात जेव्हा भटक्या विमुक्त समाजाच्या हातात खऱ्या अर्थाने अर्थव्यवस्थेची सुत्रे होती, त्यावेळी भारताचा जीडीपी ३३ टक्के इतका होता. त्यामुळे भटके विमुक्त समाजाला ऊर्जितावस्था आणल्यास पुन्हा देशाची प्रगती शक्य असल्याचे प्रतिपादन भटके विमुक्त, दलित, वनवासी, ओबीसी समाज विकास परिषदेच्या माजी अध्यक्षा सुवर्णा रावल यांनी केले. यावेळी त्यांच्या हस्ते सामाजिक कार्यकर्त्या सीमा चित्ते यांना शौर्यगामिनी झाशीची राणी लक्ष्मीबाई शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आला.
येथील राणी लक्ष्मी भवन येथे झालेल्या या सोहळ्यात व्यासपीठावर राणी लक्ष्मी भवनच्या शुभांगी कुलकर्णी आणि मंगल साैंदाणकर उपस्थित होत्या. यावेळी बोलताना रावल यांनी सध्या बहुतांश भटके विमुक्त समाज हा सोयी-सुविधांपासून वंचित असून त्यामुळेच तो मागे राहिला असल्याचे नमूद केले. त्यांना शिक्षणासह कौशल्यात पारंगत करून ऊर्जितावस्थेला आणण्याची गरज असल्याचेही रावल यांनी नमूद केले. यावेळी पुरस्कारार्थी चित्ते यांनी मनोगत व्यक्त करून आईपासून कार्याबाबत प्रेरणा घेतल्याचे सांगून पुरस्कारामुळे जबाबदारी वाढण्याचे भान दिल्याचे नमूद केले. भविष्यातही गोरगरिबांसाठी असेच कार्य अव्याहतपणे सुरुच ठेवणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. यावेळी आयोजकांच्या वतीने तिथे उपस्थित असलेल्या सीमा यांच्या मातोश्री श्रीमती चित्ते यांचा सत्कार ॲड. सुलभा लिमये यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती खांडवे तर आभार भाग्यश्री पाटील यांनी मानले.
इन्फो
झाशीच्या राणीच्या वंशजांचा सत्कार
या कार्यक्रमास विशेष निमंत्रित केलेले झाशीच्या राणी लक्ष्मीबाईच्या घराण्यातील पाचव्या पिढीचे वंशज ॲड. विवेक तांबे यांचादेखील यावेळी सत्कार करण्यात आला. ॲड. तांबे हे उच्च न्यायालयात वकिली करीत असून सामाजिक कार्यातही अग्रेसर असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
फोटो
१९राणी भवन