नाशिक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथील महामार्ग प्राधिकरणचे उपअभियंत्याच्या डोक्यावर आमदार नितेश राणे आणि स्वाभिमानी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी चिखलाची बादली ओतल्याच्या घटनेचा जिल्हा प्रशासनाच्या विविध विभागांतील अभियंते आणि कनिष्ठ अभियंता संघटनेच्या वतीने जाहीर निषेध करीत घोषणा देण्यात आल्या. तसेच या प्रकाराबाबत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करीत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.महामार्गावर झालेल्या खड्डे आणि चिखलाबाबत राष्टय महामार्ग प्राधिकरणचे उपअभियंता शेडेकर यांना महामार्गावरील गडनदी पुलावर शिवीगाळ, दमदाटी करीत डोक्यावर चिखलाची बादली ओतण्याचा प्रकार करण्यात आला, असा आरोप आहे. अशा प्रकारांमुळे शासकीय अधिकारी आणि कर्मचाºयांचे मनोबल खचत असल्याने या संपूर्ण प्रकाराचा निषेध कनिष्ठ अभियंता संघटनेच्या वतीने करण्यात आला.लोकप्रतिनिधी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या अशा वर्तनामुळे अधिकारी वर्गात तीव्र नाराजी निर्माण झाल्याचे सांगून दोषींवर तातडीने कारवाईची मागणीदेखील करण्यात आली. यापुढे कोणत्याही अभियंत्याबाबत असा प्रकार घडू नये़ अशी मागणीही यावेळी करण्यात आली़ सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा विभाग, जलसंधारण विभाग, यांत्रिकी विभाग यांसह विविध विभागांच्या अभियंत्यांनी या निषेध आंदोलनात सहभाग घेतला.यावेळी संघटनेच्या वतीने नाशिक जिल्ह्याचे सचिव दिलीप चव्हाण, जगदीश महाजन, प्रदीप पाटील, शंकर शेवाळे, किशोर जोशी, अमोल बागुल, रूही आहेर, गजानन अहिरे, वि. म. कापडणीस, के. एम. पवार, ए. बा. भामरे, ज. व. महाजन यांच्यासह अन्य अधिकारी आणि अभियंत्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन निवेदन दिले.यावेळी हम सब एक हैं, अन्याय दूर झालाच पाहिजे अशा घोेषणांसह निषेधाचे फलक बांधकाम विभागात करण्यात आलेल्या आंदोलनात झळकवण्यात आले. तसेच अनेक महिला आणि पुरुष अभियंत्यांनी निषेध असे लिहिलेल्या गांधीटोप्या घालून देखील घटनेचा निषेध केला.
अभियंता संघटनेकडून निषेध आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2019 1:22 AM