शासनाच्या कृषी विभागातंर्गत मालेगाव, सटाणा व नांदगाव तालुक्यातील शेतकरी उच्च उत्पादनाचा स्त्रोत म्हणून फळबाग लागवडीकडे मोठ्या प्रमाणात वळत आहे. त्यामुळे शासनामार्फत राबविल्या जाणाऱ्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत फळबाग लागवड, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेत शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी कृषी विभागाच्या शासकीय, कृषी विद्यापीठाकडील संशोधन केंद्र येथून शासकीय परवाना व खासगी नोंदणीकृत फळरोपवाटिकांवरून कलमे शेतकऱ्यांनी स्वत: विकत घेऊन लागवड करायची आहे. शेतकऱ्यांनी दर्जेदार उच्च गुणवत्तेचे कलमे उपलब्ध होण्यासाठी उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांना शासनाने फळझाडे रोपवाटिका परवाना अधिकारी म्हणून घोषित केले आहे. ज्या शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या परवान्यावर शासकीय रोपवाटिका किंवा कृषी विद्यापीठ संशोधन केंद्र किंवा कृषी विज्ञान केंद्र येथून डाळींब, आंबा व पेरू कलमांची उचल करून लागवड केलेली असेल व लागवडीपासून मातृवृक्षाचे लागवडीपासून डाळिंब, पेरूसाठी वय ३ वर्ष व आंबा ५ वर्ष पूर्ण झालेले असतील अशा शेतकऱ्यांनी उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयाकडे खासगी नोंदणीकृत रोपवाटिका परवाना मिळण्यासाठी आपले सरकार पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करून प्रस्ताव सादर करावा. सदर मातृवृक्षाची कृषी विद्यापीठ शास्त्रज्ञ व उपविभागीय कृषी अधिकारी मालेगाव कार्यालय समितीमार्फत तपासणी होऊन फळरोपवाटिका परवाना दिला जाईल.
इन्फाे
...तर शेतकऱ्यांचे नुकसान!
मालेगाव उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयामार्फत यापूर्वी उपविभागातील खासगी नोंदणीकृत रोपवाटिकांना फळझाड परवाने दिलेले आहेत अशा फळरोपवाटिकाधारकांनी ज्या फळपिकासाठी परवाना घेतला आहे, त्याच फळपिकाचे कलमे उत्पादन व विक्री करावी त्याव्यतिरीक्त इतर फळपिकांचे कलमे उत्पादन व विक्री करण्यात येऊ नये. उपविभागात अनधिकृत फळरोपवाटिकांमधून कृषी विद्यापीठांनी शिफारस न केलेल्या फळपिकांच्या वाणांची कलमे उत्पादित व विक्री करू नये. कृषि विद्यापीठांची शिफारस न केलेल्या वाणांची लागवड केल्यास शेतकऱ्यांना भविष्यात आर्थिक नुकसान होऊ शकते.