नाशिक : दक्षिणगंगा असलेल्या गोदावरी नदीचे रूपडे पालटविण्यासाठी स्मार्ट सिटी अंतर्गत प्रोजेक्ट गोदा राबविण्यात येणार असून, त्यासाठी मागविलेल्या निविदा मंजुरी अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे नव्या वर्षात गोदावरी नदीचे रूप बदलण्याची शक्यता आहे. दोन किलोमीटर लांबीच्या पट्ट्याचा विकास करण्यात येणार आहे. रामवाडी पूल ते होळकर पूल तेथून पुढे गाडगे महाराज पूल आणि त्या पलीकडे टाळकुटे पूल असे तीन टप्पे करण्यात येणार आहेत. त्यातील पहिल्या टप्प्यात म्हणजे रामवाडी ते होळकर पुलाच्या दरम्यान, मनोरंजन आणि अन्य सुविधा केंद्र असणार असून तेथे वॉक वे, अॅपी थिएटर, अॅक्युप्रेशर पाथवे, बोर्डेक्स मिरर इफेक्ट,जेट्टी, सायकल मार्ग, दगडी बाक प्रस्तावित आहे.दुसऱ्या टप्प्यात अध्यात्मिक क्षेत्र तर तिसºया टप्प्यात वाहनतळ आणि अन्य सुविधा असणार आहेत. याशिवाय या प्रकल्पांतर्गत होळकर पुलाखालील मेकॅनिकल गेटदेखील बसवण्यात येणार असून फॉरेस्ट पूल ते होळकर पूल दरम्यान ३.२० किमीचा गोदापात्रातील गाळ काढण्यात येणार आहे. सध्या रामकुंडालगत असलेले वाहनतळदेखील अन्यत्र स्थलांतरित करण्यात येणार आहे.महापालिकेने यासंदर्भात निविदा मागवल्या असून, एकच निविदा प्राप्त झाली आहे. सदरची निविदा मंजूर करण्याची कार्यवाही सुरू आहे. नव्या वर्षात गोदावरी नदीचे रूप बदलण्यास प्रारंभ झाला असेल असे महापालिकेच्या जनसंपर्क विभागाने कळवले आहे.गंगाआरतीला मुहूर्त लागणार?स्मार्ट सिटी अंतर्गत गोदावरी नदीचे रूपडे बदलणार असून, गंगाआरती पर्यटन विकास महामंडळ सुरू करणार आहे. अर्थात, पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी तशी घोषणा केली असली तरी आरतीला मुहूर्त लागलेला नाही.
प्रोजेक्ट गोदा ; गोदावरीचे बदलणार स्वरूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2018 1:06 AM