नाशिक : केवळ दोन तालुक्यांचे राहिलेले काम वगळता उर्वरित तेरा तालुक्यात नवीन वर्षात आॅनलाइन (संगणकीकृत) सातबारा मिळण्याची अपेक्षा असतानाच सोलापूर येथील न्यायालयीन झालेल्या एका प्रकरणामुळे नाशिककरांना आता नवीन वर्षात आॅनलाइन सातबारा मिळणे अवघड बनले आहे.जिल्हाधिकारी कार्यालया-मार्फत सर्वच पंधरा तालुक्यात या डिसेंबर अखेर ग्रामीण भागातील सर्वांनाच आॅनलाइन सातबारा देण्याची सोयसुविधा देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात आली होती. नाशिक व मालेगाव तालुक्यांचा अपवाद वगळता उर्वरित तेरा तालुक्यातून आॅनलाइन सातबारा देण्याची कार्यवाही पूर्ण झाली होती; मात्र सोलापूर जिल्ह्णातील एका आॅनलाइन सातबारा प्रकरणी दाखल झालेल्या न्यायप्रविष्ट प्रकरणात न्यायालयाने आॅनलाइन देण्यात आलेला सातबारा व हस्तलिखित सातबारा यांची पडताळणी व जुळवणी करून नंतरच आॅनलाइन सातबारा देण्याबाबत निर्देश दिले आहेत. त्यामुळे नाशिक जिल्हा प्रशासनाला आता आॅनलाइन दिलेला सातबारा व हस्तलिखित सातबारा यांची पडताळणी तसेच प्रत्यक्ष चावडीवर त्या सातबाऱ्याचे वाचन त्यानंतर संबंधित सातबारा मालकांना दाखवून नंतरच आॅनलाइन सातबारा देण्याबाबतची कार्यवाही करता येणार आहे. त्यामुळे नवीन वर्षातही नागरिकांना आॅनलाइन सातबारा मिळण्याचे स्वप्न धूसर झाले आहे. (प्रतिनिधी)
संगणकीकृत सातबारा लांबणीवर
By admin | Published: December 29, 2015 11:35 PM