इगतपुरी : नगरपालिका निवडणुकीत प्रथमच प्रचंड चुरस निर्माण झाली आहे. प्रत्येक पक्षाने आपल्या स्वतंत्र प्रचारशैलीने मतदारराजाला आकर्षित करण्यासाठी विविध तंत्र राबवित आहे. आपापली सत्तास्थाने बळकट असल्याचे समजून विविध आश्वासने देण्यात येत आहे. निवडणुकीत गैरप्रकार होऊ न देण्यासाठी प्रशासन तत्पर असले तरी अखेरच्या टप्प्यात या विषयावर चित्र वेगळे असण्याची शक्यता नाकारता येणार नाही. आज रविवार सुटीचा दिवस असल्याने उमेदवार प्रचारासाठी त्याचा पुरेपूर फायदा घेतील.इगतपुरी शहरावर भगवा फडकविण्यासाठी संजय इंदूलकर यांच्या नेतृत्वाखाली वाहनांतून प्रचार, प्रसिद्धीपत्रके आदी साधने वापरली जात असली तरी प्रत्येक मतदाराला व्यक्तिगत भेटून भूमिका समजविण्यात येत आहे. इगतपुरीला विकसित करण्यासाठी शिवसेना उमेदवार मतांचे दान मागत आहेत. महेश ऊर्फ रोंग्या शिरोळे नगराध्यक्षपदासाठी बहुजन विकास आघाडीचे उमेदवार आणि प्रमुख नेते आहेत. तळागाळातील लोकांपर्यंत जाऊन बहुजन विकास आघाडीचा विकासाचा अजेंडा ते मांडताना दिसतात. सर्व उमेदवारांनी वैयक्तिक गाठीभेटी आणि पारंपरिक प्रचारतंत्र राबवून मतदार आकृष्ट केले आहेत. आमदार निर्मला गावित यांचा करिश्मा आणि पारंपरिक मतदारांच्या भरवशावर इंदिरा काँग्रेसचे प्रचार संयोजन सुरू आहे. इगतपुरीला इंदिरा काँग्रेस पक्ष तारू शकतो अन्यथा सर्वच इतर पक्षांनी शहर बकाल केले असल्याचे नागरिकांना पटविण्यात येत आहे. एकंदरीत इगतपुरीत सर्वच पक्षांनी आपापली प्रचार यंत्रणा सक्रिय केल्याचे चित्र आहे. सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना नवनवे टार्गेट देण्यात येत आहे. प्रथमच प्रचंड चुरस असणारी ही निवडणूक असल्याने जिल्ह्याचे याकडे लक्ष लागले आहे.
रविवार ठरणार प्रचारवार : आकर्षित करण्यासाठी नवनवे फंडे वैयक्तिक भेटींवर उमेदवारांचा भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2017 11:49 PM
नगरपालिका निवडणुकीत प्रथमच प्रचंड चुरस निर्माण झाली आहे.
ठळक मुद्देअखेरच्या टप्प्यात चित्र वेगळे वाहनांतून प्रचार, प्रसिद्धीपत्रके वापरली