नाशिक : समाजातील सर्व घटकांना शिक्षण मिळण्यासाठी विविध विद्याशाखांच्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळणे आवश्यक आहे. सर्व घटकांच्या शिक्षणासाठी आपला नेहमी आग्रही असून, आपण त्यामुळेच आरक्षणाच्या बाजूने असल्याचे प्रतिपादन खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी केले.क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेच्या औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाचे उद्घाटन डॉ. मुंडे यांच्या हस्ते शनिवारी (दि.१५) झाले त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. संस्थेचे अध्यक्ष कोंडाजी आव्हाड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सोहळ्यात व्यासपीठावर खासदार भारती पवार, महापौर रंजना भानसी, जिल्हा परिषद सदस्य शीतल सांगळे, माजी मंत्री तुकाराम दिघोळे, आमदार बाळासाहेब सानप, सीमा हिरे, किशोर दराडे, संत साहित्य अभ्यासक तुळशीराम गुट्टे महाराज, डॉ. डी. एल. कºहाड, इंदुमती नागरे आदी उपस्थित होते. डॉ. प्रीतम मुंडे म्हणाल्या, औषधनिर्माणशास्त्रात चांगले विद्यार्थी घडून त्यांनी चांगली आणि दर्जेदार औषधे निर्माण केल्याशिवाय डॉक्टर रुग्णांची चांगली सेवा करू शकत नसल्याचे सांगत औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयांची सध्याच्या काळात मोठ्या प्रमाणात गरज असून, ही गरज ओळखून संस्थेने सुरू केलेले महाविद्यालय महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले. त्याचप्रमाणे संस्थेचे पब्लिक , प्रायव्हेट पार्टीपिशिन (पीपीपी) मधून वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा सल्ला संचालक मंडळाला दिला. तर आमदार देवयानी फरांदे यांनी, आपण फार्मसी महाविद्यालयाच्या शिक्षिका असल्याने आपल्याला या क्षेत्रातला अनुभव असल्याचे सांगत महाविद्यालयाचे शासन दरबारी पालकत्व स्वीकारण्याचे आश्वासन देतानाच संस्थेने पोलीस मुख्यालयातील पालकांची मागणी लक्षात घेऊन सीबीएसई बोर्डाची शाळा सुरू करण्यासही सुचविले. तर औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाच्या माध्यमातून संस्थेने सातत्यपूर्ण प्रयत्नातून मैलाचा दगड पार केल्याचे मत कोंडाजी आव्हाड यांनी अध्यक्षीय मनोगतातून व्यक्त केले. दरम्यान, संस्थेचे सरचिटणीस हेमंत धात्रक यांनी प्रास्ताविक केले.उद्घाटन सोहळ्यात हशाखासदार प्रीतम मुंडे या नाशिकच्या सून असल्याने त्यांनी आपण सर्वांचा सन्मान करीत आल्याने पोहोचण्यास उशीर झाल्याचे सांगत दिलगिरी व्यक्त केली. मात्र गोपीनाथ मुंडे यांची कन्या असल्याने आपण प्रथम नाशिकची मुलगी आणि नंतर सून असल्याने आपला नाशिकवर अधिक अधिकार असून, आपल्या फार्मसी महाविद्यालयात आणि मेडिकल महाविद्यालय सुरू झाल्यास त्यातील प्रवेशांमध्ये माझा कोटा राखून ठेवा, असे सांगताच सभास्थळी एकच हशा पिकला.सार्थक भटचा सन्मानके. व्ही. एन. नाईक महाविद्यालयातील विद्यार्थी सार्थक भट यांनी वैद्यकीय प्रवेशासाठी राष्ट्रीय स्तरावर घेतल्या जाणाऱ्या नीट परीक्षेत देशात सहावा, तर महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक पटकाविला आहे. त्यापार्श्वभूमीवर संस्थेतर्फे सार्थकसह नीट परीक्षेतील अन्य यशस्वी विद्यार्थ्यांचाही यावेळी संस्थेतर्फे सत्कार सत्कार करण्यात आला.महापौरांचा अवमानकेव्हीएन नाईक शिक्षण संस्थेच्या औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाच्या उद्घाटन सोहळ्यात व्यासपीठावर विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. परंतु, या राजकीय मंडळींच्या या भाऊगर्दीत शहराच्या प्रथम नागरिक महापौर रंजना भानसी यांना थेट तिसºया रांगेत बसविण्यात आले. त्यामुळे सत्कार सोहळा आटोपताच महापौरांनी कार्यक्रमातून काढता पाय घेतल्याने आयोजकांकडून शहराच्या प्रथम नागरिक असलेल्या महापौर रंजना भानसी यांचा अवमान झाल्याची चर्चा उपस्थितांमध्ये होताना दिसून आली.
वंचितांच्या शिक्षणासाठी आरक्षणाच्या बाजूने: प्रीतम मुंडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 1:53 AM
समाजातील सर्व घटकांना शिक्षण मिळण्यासाठी विविध विद्याशाखांच्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळणे आवश्यक आहे. सर्व घटकांच्या शिक्षणासाठी आपला नेहमी आग्रही असून, आपण त्यामुळेच आरक्षणाच्या बाजूने असल्याचे प्रतिपादन खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी केले.
ठळक मुद्देनाईक संस्थेच्या औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाचे उद्घाटन