नाशिक : मतदानासाठी काउंटडाऊन सुरू झाले असताना जिंकण्यासाठी अखेरची व्यूहरचना करण्यास प्रारंभ झाला असून, वेगवेगळ्या माध्यमातून प्रतिस्पर्धाला हैराण करण्यासाठी जमेल ते प्रकार केले जात आहेत. पंचवटीत एका पक्षाच्या उमेदवाराची बदनामीकारक पत्रके वाटल्याने त्याने आचारसंहिता कक्षाकडे तक्रार केली आहे. दुसरीकडे अनेक ठिकाणी प्रतिस्पर्ध्याने माघार घेतली किंवा पाठिंबा दिला अशा प्रकारची प्रभागाप्रभागात चर्चा पसरवण्याचे प्रकार सुरू आहेत. महापालिकेच्या निवडणुकीसाठी बहुतांशी भागात पराकोटीची स्पर्धा असून, काहीही झाले तरी विजय मिळवायचाच, या उद्देशाने रिंगणात उतरलेले उमेदवार प्रतिस्पर्धी कसा गोंधळात पडले किंवा अडचणीत येईल, अशी व्यूहरचना करीत आहेत. रविवारी जाहीर प्रचाराची सांगता होत असताना अशाप्रकारांना ऊत आला आहे. सिडको विभागात एका उमेदवाराच्या मोटारीची काच फोडण्यात आली तर याच विभागात एका पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचाराचा मंडप जाळण्यात आल्याचे सांगण्यात आले. मध्य नाशिकमध्ये तर एका पक्षाच्या उमेदवाराला दुसऱ्या पक्षाच्या उमेदवाराच्या समर्थकांनी आपल्या भागात येऊन प्रचार का केला, असे विचारून पळवून लावल्याचे सांगण्यात आले. अशाप्रकारच्या घटनांमधून प्रतिस्पर्ध्यांवर मानसिक दबाव टाकण्याचे प्रकार सुरू आहेत. पंचवटीत तर एका उमेदवाराचे जमीन व्यवहार आणि अन्य बाबतीत अपप्रचार करणारी पत्रके वाटण्यात आली. त्यामुळे हे सर्व खोटे आहे, हे सांगण्यासाठीच त्या उमेदवाराला धावपळ करावी लागली. याप्रकारणी संबंधित उमेदवाराने निवडणूक अधिकाऱ्यांकडे रीतसर तक्रार केली आहे. अशाच प्रकारे काही प्रभागात प्रतिस्पर्ध्याने माघार घेतली, आपल्याला छुपा पाठिंबा दिला अशा प्रकारची चर्चा पसरविण्यात येत असून, उमेदवार हैराण झाले आहेत.
छुपा (अप)प्रचार आणि प्रतिस्पर्ध्यांवर वार...!
By admin | Published: February 19, 2017 11:53 PM