घोटी : आदिवासी विकास विभाग व क्रीडा संचालनायातील समन्वयाच्या अभावामुळे इगतपुरी तालुक्यातील पिंपरी सद्रोद्दिन येथे ४७ एकर (१८ हेक्टर ७३ आर) जागेत रखडलेल्या राज्यातील पहिल्या आदिवासी क्रीडा प्रबोधिनीला चालना मिळाली असून नुकत्याच सादर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात प्रबोधिनीसाठी ६० कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.अनुसुचित जमातीच्या मुलांमध्ये जन्मतःच असलेल्या विविध क्षमता, त्यांचे क्रीडा नैपुण्य काही ठराविक खेळाकरिता उपयोगी ठरू शकतात. त्यामुळे अनुसुचित जमातीच्या मुलांना क्रीडा विषयक सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्यास ही मुले अनेक खेळामध्ये राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर यश संपादन करू शकतात असा विश्वास शासनाला असल्यामुळे आदिवासी क्रीडा प्रबोधिनीची निर्मिती करण्यात येणार होती. मात्र आदिवासी विकास विभाग व क्रीडा संचालनायातील समन्वयाच्या अभावामुळे प्रबोधिनीचे घोंगडे भिजत पडले होते.
मात्र यंदाच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनात या क्रीडा प्रबोधनीसाठी ६०कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. क्रीडा प्रबोधिनी करीता इगतपुरी तालुक्यात जलसंपदा विभागाची प्रिप्री सद्रोद्दिन येथील जमीन आदिवासी विकास विभागास हस्तांतरीत करण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून इमारत बांधकामाचा आराखडा तयार करण्याचे काम देखील सुरू होते. मात्र, लोकप्रतिनिधींच्या उदासिनतेचाही फटका या प्रबोधिनीला बसला होता. आता निधीची तरतूद झाल्याने आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.आजपर्यंत या क्रीडा प्रबोधनीचा प्रश्न अनुत्तरीतच होता. अनुसुचित जमातीच्या मुलांना क्रीडा विषयक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने या क्रीडा प्रबोधिनीचे बांधकाम तातडीने सुरु करण्याची मागणी देखील वारंवार करण्यात आली होती. मात्र, महाविकास आघाडी सरकारने या प्रबोधिनीसाठी तरतूद करत चालना दिलेली आहे.- हिरामण खोसकर, आमदार