नाशिक (सुयोग जोशी) : पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या महापालिकेच्या विविध विभागांतील तब्बल ५५ जणांना नववर्षात पदोन्नती देण्यात आली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अशोक करंजकर यांनी पदोन्नतीचा प्रश्न मार्गी लावत कर्मचाऱ्यांना नवीन वर्षात भेट दिली. मंगळवारी (दि.२) घनकरचरा, अग्निशमन, अकाउंट, नगरसचिव या विभागातील पदोन्नतीची यादी प्रसिद्ध करण्यात आली. प्रशासन उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर यांच्याकडून मागील काही दिवसांपासून पदोन्नतीची प्रक्रिया सुरू होती. अखेर त्यास मंगळवारी मुहूर्त लागला. पदोन्नती मिळाल्याचे समजताच संबंधित कर्मचाऱ्यांनी आनंदोत्सव साजरा केला.घनकचरा विभागात सर्वाधिक पदोन्नती मिळाल्या असून, स्वच्छता मुकादम व स्वच्छता निरीक्षक याप्रमाणे पदोन्नती मिळाली आहे. या पदोन्नतीकडे संबंधित विभागातील कर्मचाऱ्यांचे लक्ष लागून होते. दोन महिन्यांपूर्वी १८ कर्मचाऱ्यांना पदोन्नती दिल्यानंतर मंगळवारी ५५ कर्मचाऱ्यांना सेवा ज्येष्ठतेनुसार पदोन्नती देण्यात आली. कागदोपत्री छाननी करून आणि अटी-शर्थी पूर्ण होत असलेल्या कर्मचाऱ्यांनाच पदोन्नती देण्यात आली आहे. यापूर्वी महापालिकेत कर्मचाऱ्यांना पदोन्नती देताना अन्यायकारक पद्धतीने झाल्याचा आरोप करण्यात आला होता. तत्कालीन प्रशासन उपायुक्त मनोज घोडे-पाटील यांच्या विरोधात थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत तक्रारी करत चौकशीची मागणी करण्यात आली होती. सेवा ज्येष्ठता असूनही त्यांना डावलण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. काहीजणांना थेट क्रीम पोस्ट देण्यात आली. तर काहींना जम्पिंग प्रमोशन दिल्याने पालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले होते. या संपूर्ण प्रकरणात कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त करण्यात येत होता. पदोन्नतीच्या फाइलवर आयुक्तांची स्वाक्षरी होताच कर्मचाऱ्यांची यादी प्रसिद्ध झाली. दरम्यान, पदोन्नती देण्यासाठी निवड समीतीच्या बैठकांचा धडाका सुरू होता. विविध संवर्गातील वर्ग तीन, चार अशा ५५ कर्मचाऱ्यांना बढती मिळाली आहे. पालिकेत गेल्या अनेक महिन्यांपासून पदे रिक्त असून, तेथे पदोन्नती मिळालेल्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती दिली जाणार आहे. उद्यान विभागातून एकही पदोन्नतीचे एकही प्रकरण नव्हते. बांधकाम विभागाचे प्रकरण न्यायालयात गेल्याने हा विभाग बाजूला ठेवत इतरांना पदोन्नती देण्यात आली आहे. घनकचरासह विविध विभागांतील कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळाल्यानंतर आता आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात येणार आहे. पुढच्या काही दिवसांतच या विभागाचीही यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.या विभागात पदोन्नती
-घनकचरा विभाग-३६ जणांना पदोन्नती मिळाली, त्यापैकी २५ स्वच्छता निरीक्षक व दहाजणांची स्वच्छता
मुकदम पदी पदोन्नती
-अग्निशमन विभाग - दहाजणांची पदोन्नती, यामध्ये एक सब ऑफिसर व नऊ लिंडिंग ऑफिसर.-लेखा विभागात सहा पदोन्नती मिळाली असून, यात चारजणांची कनिष्ठ लेखापाल म्हणून नियुक्ती.-सुरक्षा विभाग २, तर नगरसचिवमध्ये एकाची सहायक नगरसचिव म्हणून बढती.