नाशिक : समाज कल्याण विभागातील पात्र ठरलेल्या २१ समाज कल्याण निरीक्षक यांना वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, तर २७ वरिष्ठ लिपिकांना प्रमुख लिपिक या पदावर पदोन्नती देण्यात आली. समाज कल्याण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पदोन्नती समितीच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला. यासंदर्भातील आदेशही काढण्यात आले आहेत. समाज कल्याण निरीक्षक व वरिष्ठ लिपिक संवर्गातील एकूण ४८ कर्मचारी याना पदोन्नतीचा लाभ झाला. त्यापैकी १० कर्मचारी नाशिक विभागातील आहेत.
राज्यातील क्षेत्रीय कार्यालयांमध्ये वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक पदे रिक्त असल्याने अधिकाऱ्यांवर यांच्यावर कामाचा ताण येत होता. पदोन्नतीमुळे आता कामकाजात सुसूत्रता येणार आहे. वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक या पदावर २१ कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीने नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. राज्यातील क्षेत्रीय कार्यालयांमध्ये या महत्त्वाच्या पदांवर कर्मचारी उपलब्ध झाल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांचा कामकाजाचा तणाव कमी होणार आहे. समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त (प्रशासन) प्रशांत चव्हाण यांच्या शाखेने यासाठी सात्यत्याने पाठपुरावा केला होता.
दरम्यान, गृहपाल, समाज कल्याण निरीक्षक, कार्यालय अधीक्षक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, लघू टंकलेखक व शिपाई या विविध संवर्गातील कर्मचाऱ्यांनादेखील यापूर्वीच पदोन्नती देण्यात आली आहे.