नाशिक : नाशकात लवकरच पर्यटन विभागाचे प्रादेशिक कार्यालय सुरू होणार असल्याने येथील पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे. महाराष्ट्र शासनाने राज्यात पर्यटन संचालनालय व त्याअंतर्गत पाच प्रादेशिक कार्यालये स्थापन करण्याचा निर्णय मार्च २०१६ मध्ये घेतला होता. त्यानुसार उत्तर महाराष्ट्रात संचालनालयाच्या प्रादेशिक कार्यालयासाठी नाशिकची निवड झाल्यामुळे नाशिक शहरासह जिल्हाभरातील विविध पर्यटनस्थळांना या प्रादेशिक कार्यालयाचा लाभ होणार आहे. नाशिकला पर्यटन संचालनालयाच्या प्रादेशिक कार्यालयाला नुकतीच मंजुरी मिळाली असून, उत्तर महाराष्ट्राला पर्यटन उपसंचालक हे नवीन पददेखील निर्माण करण्याला राज्य शासनाच्या उच्चाधिकार समितीने मंजुरी दिली आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील पर्यटन वाढीला या निर्णयामुळे मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे. नाशिक शहरात प्रभू श्रीरामचंद्रांच्या अस्तित्वाचा इतिहास उलगडवून दाखवण्याच्या उद्देशाने केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने रामायण सर्किट विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रभू श्रीराम यांचे वास्तव्य असलेल्या नाशिकचाही यात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे नाशिकच्या पर्यटनाला चालना मिळणार आहे. केंद्रीय पर्यटन विभागामार्फत स्वदेश योजनेअंतर्गत रामायण सर्किट विकसित करण्याचे ठरवले आहे. संपूर्ण विश्वात प्रभू श्रीरामचंद्रांच्या रामायणाच्या माध्यमातून इतिहास सर्वांना माहीत आहे. भारतातील असलेल्या प्रभू श्रीरामचंद्रांचा इतिहास या माध्यमातून उलगडावा यासाठी हा प्रकल्प साकारण्यात येणार आहे. वनवासाच्या काळात प्रभू रामचंद्रांचे गोदावरीच्या तीरी वास्तव्य होते. त्यामुळेच नाशिकचाही यात समावेश झाला आहे. या प्रकल्पाला शंभर टक्के निधी केंद्र सरकार देणार आहे. त्यात आता नाशिकला राज्याच्या पर्यटन संचालनालयाअंतर्गत प्रादेशिक कार्यालय स्थापन होणार असल्याने उत्तर महाराष्ट्रातील पर्यटन वाढीसाठी या कार्यालयाचा फायदा होणार आहे.पर्यटकांना नाशिकचे आकर्षणमहाराष्ट्र राज्यासह देश-विदेशातील विविध भागातून नाशिकमध्ये येणाºया पर्यटकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत असताना येथील श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरसहगंगा गोदावरी मंदिर, काळाराम मंदिर, सीतागुंफा, कपालेश्वर मंदिर, श्री नारोशंकर (रामेश्वर) मंदिर, बालाजी मंदिर, यशवंतराव महाराज मंदिर, मोदकेश्वर गणपती, काट्या मारुती, तपोवन, भद्रकाली मंदिर, सोमेश्वर मंदिर, गंगेश्वर वेदमंदिर आदी विविध मंदिरांसोबतच पांडवलेणी, चित्रपटमहर्षी दादासाहेब फाळके स्मारक, बुद्धस्मारक, चांभार लेणी, सप्तशृंगी देवी, सर्वतीर्थ टाकेद, रामशेज किल्ला, कपिलातीर्थ कावनई आदी प्रेक्षणीय स्थळीही पर्यटकांचा ओघ वाढत आहे. यासोबतच जिल्ह्यातील कृषी पर्यटन, वाइन पर्यटन व दुर्ग पर्यटनाचाही या प्रादेशिक कार्यालयाच्या माध्यमातून विकास व्हावा, अशी नाशिककरांची अपेक्षा आहे. नाशिकमध्ये महाराष्ट्र पर्यटन विक ास महामंडळाचे कार्यालय असून, त्या माध्यमातून पर्यटकांच्या निवास व प्रवास सुविधांच्या विकासासाठी योगदान लाभते. आता राज्य शासनाने पर्यटन संचालनालयाच्या अंतर्गत जिल्ह्यात प्रादेशिक कार्यालय सुरू क रण्याचा निर्णय घेतल्याने येथेल पर्यटनस्थळांचाही मोठ्या प्रमाणात विकास होण्यास मदत होईल. सध्या सुरू असलेल्या विकासकामांनाही गती मिळण्यास मदत होईल. त्यामुळे पर्यटन क्षेत्रातील नाशिकचे स्थान अधिक उंचावणार आहे. - दत्ता भालेराव, अध्यक्ष, ट्रॅव्हल एजंट असोसिएशन, नाशिक
पर्यटन विकासाला मिळणार चालना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 11:46 PM