शांतारामबापूंची बंडखोरी अन् मानेंचा प्रचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2019 12:50 AM2019-09-28T00:50:53+5:302019-09-28T00:53:05+5:30
ब हुतेक सन १९९५ ची ती निवडणूक असेल. उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येत होते. त्यावेळी रिंगणात मुरलीधर माने, डॉ. दौलतराव आहेर हे मातब्बर उमेदवार होते. त्यांचे कार्यकर्ते ठरलेले, त्यांच्यावर प्रेम करणारा कार्यकत्यांचा गोतावळा मोठा होता.
आठवणीतील निवडणूक
ब हुतेक सन १९९५ ची ती निवडणूक असेल. उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येत होते. त्यावेळी रिंगणात मुरलीधर माने, डॉ. दौलतराव आहेर हे मातब्बर उमेदवार होते. त्यांचे कार्यकर्ते ठरलेले, त्यांच्यावर प्रेम करणारा कार्यकत्यांचा गोतावळा मोठा होता. महत्त्वाचे म्हणजे शांतारामबापू वावरे यांनी कॉँग्रेस पक्षाविरुद्ध बंडखोरी करून आपली उमेदवारी जाहीर केलेली. मुरलीधर माने यांच्याकडे तरुण कार्यकर्त्यांची फौज होती. त्यांना मानणारा मोठा वर्गदेखील होता. प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली. लोकांच्या भेटीगाठी व प्रचाराची प्रचार यंत्रणा कशी असावी याबाबत बैठका झडत होत्या. उमेदवाराने कार्यकर्त्यांसह लोकांना, मतदारांना विभागवार भेटायचं ठरलं. त्याप्रमाणे आम्ही भद्रकाली, शिवाजी रोड परिसरात प्रचारफेरी काढण्याचे ठरविले. रिक्षा, लाउडस्पीकरसह मामू हा कार्यकर्ता निशाणी व उमेदवाराचे नाव सांगण्यासाठी सज्ज होता. बॅनर व झेंड्यांनी रिक्षा सजलेली होती. कार्यकर्ते हातात झेंडे घेऊन तयार होते. माझ्या घरासमोर नवापुरा कन्झ्युमर सोसायटीजवळ परिसरातील कार्यकर्ते उमेदवाराचे स्वागत करण्यासाठी उभे होते. त्यात अंबादास बागुल, छबूनाना वाघ, शिर्के, अॅड. रघुनाथ वाघ हे प्रमुख होते. घरात औक्षणाची तयारी झाली. सर्वजण कॉँग्रेसचे अधिकृत उमेदवार माने यांच्या प्रतीक्षेत होते. मात्र उमेदवार येण्यात थोडा उशीर झाला. याचदरम्यान शांतारामबापू आमच्या भद्रकालीतील उमेदवार असल्याने साहजिकच त्यांच्याकडे राबता अधिक होता. तसेच त्यांच्याबाबत आदरही होता. तितक्यात बापूंची जीप समोर आली. बापू थांबले, त्यांना पाहून आम्ही कार्यकर्ते पसार झालो. बापू घराजवळ आले. घरच्यांना त्यांनी खाली बोलावले आणि हे काय चालले आहे, गल्लीतला उमेदवार असताना ही पोरं काय करत आहेत, कोणाची वाट पाहात आहेत, असे विचारत त्यांनी प्रश्नांचा भडिमार केला. त्यांच्या भावना माझ्या घरच्यांनी ओळखून बापंूचे औक्षण केले. गल्लीतील दोन जणांना गाडीत बसवून तुम्ही ज्येष्ठ आहात. त्या पोराटोरात थांबून काय करणार? त्याचं काम त्यांना करू द्या, असे सांगत बापू तेथून आमच्या दोघा कार्यकर्त्यांना घेऊन निघून गेले. मी मात्र माने साहेबांना घेऊन प्रचार करत होतो.