नाशिक: राज्यातील असंघटित कामगार व स्थलांतरित कामगारांची त्यांची दखल घेऊन केंद्र व राज्य सरकारने असंघटित कामगार कल्याण कायद्याअंतर्गत या कामगारांची नोंदणी करावी व आंतरराज्य स्थलांतरित कामगार कायद्याची योग्य अंमलबजावणी करावी ,अशी मागणी विविध कामगार संघटनांच्या वतीने पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. कोरोनाच्या भीतीमुळे मुंबई, पुणेसह नाशिक शहरातील लाखो परप्रांतीय कामगार आणि मजूर आपआपल्या मूळगावी स्थलांतरित झाले.परंतू अद्यापही त्यांचे हाल होत आहेत. त्यांच्या समस्यासंबंधी सीटू, आयटक यांच्यासह संघटनांनी आवाज उठविला . आता या संघटनांच्या वतीने पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. कामगार कल्याण मंडळ स्थापन करावे ,असंघटित कामगारांसाठी दरमहा 7500 रुपये आर्थिक सहाय्य देण्यात यावे , असंघटित क्षेत्रातील कामगारांना सामाजिक सुरक्षा लागू करण्यात यावी, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. टाळेबंदी लागू झाल्यानंतर असंघटित क्षेत्रातील कामगार व स्थलांतरित कामगारांची वास्तव परिस्थिती सर्वांसमोर उघड झाली आहे .राज्यांमध्ये यंत्रमाग कामगार , विडी कामगार, घरेलू कामगार, बांधकाम मजूर ,हॉकर्स ,टपरीधारक ,रिक्षाचालक, टेम्पो व टॅक्सीचालक ,ऊस तोडणी कामगार आदी घटकांचा समावेश होतो .त्यापैकी बांधकाम कामगारांसाठी कल्याण मंडळ स्थापन करण्यात आले आहे .परंतु कर्मचारीवर्ग नसल्यामुळे ते पूर्ण कार्यक्षमतेने काम करत नाही घर कामगारांसाठी स्थापन केलेले कल्याण मंडळ केवळ कागदावरच उरले आहे. त्यामुळे स्थानिक तसेच स्थलांतरित कामगारांचे प्रश्न तातडीने सोडवावेत अशी मागणी विविध कामगार संघटनांच्या वतीने करण्यात आली असून यासंबंधी पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांकडे निवेदन पाठविण्यात आले आहे.
स्थलांतरित कामगार कायद्याची योग्य अंमलबजावणी करा- कामगार संघटनांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2020 5:48 PM
स्थलांतरित कामगारांची दखल घेऊन केंद्र व राज्य सरकारने असंघटित कामगार कल्याण कायद्याअंतर्गत या कामगारांची नोंदणी करावी व आंतरराज्य स्थलांतरित कामगार कायद्याची योग्य अंमलबजावणी करावी,अशी मागणी विविध कामगार संघटनांच्या वतीने करण्यात आली आहे.
ठळक मुद्देकामगार कल्याण कायद्याअंतर्गत स्थलांतरित कामगारांची नोंदणी कराविविध कामगार संघटनांची केंद्र व राज्य सरकारकडे मागणी