नाशिक : आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने मतदान केंद्रांच्या पुनर्रचनेबाबत केलेल्या सूचनांनुसार जिल्ह्यात २२० नवीन मतदान केंद्रांची भर पडली असून, त्यांच्या मान्यतेचे प्रस्ताव राज्यपातळीवरून केंद्रीय पातळीवर पाठविण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्ह्णातील मतदान केंद्रांची संख्या आता ४,४४८ इतकी झाली आहे. पुढच्या वर्षी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून निवडणूक आयोगाने आत्तापासूनच मतदारयाद्यांचे अद्यावतीकरण करण्याबरोबरच मतदान केंद्रांची पुनर्रचना करण्याच्याही सूचना केलेल्या आहेत. साधारणत: ग्रामीण भागात एका मतदान केंद्रावर १२०० मतदारांच्या मतदानाची सोय तर शहरी भागात हीच संख्या १४०० इतकी असून, त्यापेक्षा अधिक मतदार असतील तर त्यासाठी नवीन मतदान केंद्र तयार करण्यास आयोगाने अनुमती दिलेली आहे. ज्या मतदान केंद्रांवर कमी मतदार असतील त्या केंद्रावर मतदारांची संख्या वाढविण्यावरही भर देण्यात आला आहे. मतदाराला त्याच्या घरापासून दोन किलो मीटरच्या आत मतदान केंद्र असावे, असा दंडक घालून देण्यात आल्याने जिल्ह्णात यापूर्वी ४,२२८ इतकी मतदान केंद्रे होती. त्यात बहुतांशी मतदान केंद्रे जुन्या मतदान केंद्राच्या आवारातच असून, काही ठिकाणी मात्र नजीकच्या शाळांमध्ये नवीन मतदान केंद्राचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. नाशिक जिल्हा निवडणूक शाखेने या मतदान केंद्रांचा प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविला असून, तेथून मान्य होऊन तो अंतिम मंजुरीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे रवाना करण्यात आला आहे.वाढलेले मतदान केंद्रे (कंसात एकूण)* नांदगाव-१० (३२६)* मालेगाव मध्य-५ (२२३)* मालेगाव बाह्ण-९ (३०८)* बागलाण-१७ (२८०)* कळवण-१५ (३३८)* चांदवड-३३ (२९४)* येवलाा-२४ (३१२)* सिन्नर-३० (३१८)* निफाड-८ (२७१)* दिंडोरी-१९ (३११)* नाशिक पूर्व-४ (२९५)* नाशिक मध्य-६ (२९४)* नाशिक पश्चिम-१२ (३३९)* देवळाली-८ (२४७)* इगतपुरी-२० (२८८)
जिल्ह्यात २२० नवीन मतदान केंद्रांचा प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2018 1:50 AM