नाशिक : शहराला दोन धरणांमधून मुबलक पाणीपुरवठा होत असतानाही अनेक भागांत पाण्याची टंचाई जाणवत असते. ती दूर करण्यासाठी महापालिकेने ४० किलोमीटर वितरण वाहिन्यांची कामे हाती घेतली असून आणखी ६० किलोमीटर वितरण वाहिन्यांची कामे हाती घेण्यात येणार आहेत. त्यामुळे अनेक भागांतील पाणीपुरवठा सुरळीत होईल परंतु त्याचबरोबर आणखी नववसाहतीत कामे करण्यासाठी राज्य शासनानाला ३० कोटी रुपयांच्या निधीसाठी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. ही कामे पूर्ण झाल्यानंतर शहराला सुमारे दीड लाख नागरीकांना लाभ होणार आहे.नाशिक शहराला गंगापूर आणि दारणा धरणातून पाणी पुरवठा केला जातो. गंगापूर धरण आणि चेहेडी बंधाऱ्याच्या माध्यमातून ४३० ते ४३५ दशलक्ष लिटर्स पाणी ६५ किलो मीटर लांबीच्या उर्ध्ववाहिनी आणि गुरुत्ववाहिनीद्वारे विविध शुद्धीकरण केंद्रात पाठविले जाते. शहरात शिवाजीनगर, बारा बंगला, पंचवटी, गांधीनगर, नाशिकरोड, निलगिरी बाग या ठिकाणी पाणी शुद्धीकरणाची प्रक्रिया केली जाते आणि शहरातील २११ किलोमीटर लांबीच्या शुद्ध पाण्याच्या मुख्य वाहिन्यांद्वारे १०३ जलकुंभ भरण्यात येते. या जलकुंभांतून ग्राहकांपर्यंत पाणीपुरवठा करण्याकरिता १८०० किलोमीटर लांबीच्या वितरण वाहिन्या आहेत. विविध व्हॉल्व्हद्वारे पाण्याचा दाब नियंत्रित करून पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र तरीही अनेक भागांत पाणीपुरवठ्याविषयी तक्रारी असतात. यासंदर्भात महापालिकेच्या वतीने वॉटर व एनर्जी आॅडिट करून घेण्यात आले. त्यानंतर आढळलेल्या त्रुटी दूर करण्यासाठी हायड्रोलिक मॉडेलिंग करण्यात आले. त्यानुसार कामांचे नियोजन करण्यात आले असून, सध्याच्या त्याच पद्धतीने कामे सुरू आहेत. शहरात चाळीस किलोमीटर लांबीच्या वितरण वाहिन्यांची कामे सुरू असून, आणखी ६० किलोमीटर वितरण वाहिन्यांची कामे येत्या काही दिवसांत सुरू होत आहेत. नाशिकच्या ज्या भागात वितरण वाहिन्या टाकण्यात येतात, त्या भागात पाणीपुरवठा सुरळीत होत जाणार आहे. त्याचप्रमाणे महापालिकेने राज्य शासनाकडे ३० कोटी रुपयांच्या कामांचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्यातील कामे पूर्ण झाल्यानंतर एकूण दीड लाख लोक संख्येला या सुधारणांचा फायदा होईल? असा विश्वास आयुक्त तुकाराम मुंढे यांनी व्यक्त केला आहे.२०१७-१८ या आर्थिक वर्षातील तरतुदीनुसार पाणीपुरवठा कामांसाठी ८० कोटी ३८ लाख रुपयांच्या कामांची तरतूद करण्यात आली होती, त्यातील ७४ कोटी रुपयांची कामे झाली आहेत. आता अनेक नव्या भागांत जलकुंभाची कामेदेखील प्रस्तावित असून, त्यामुळे समप्रमाणात पाणीपुरवठा होण्यास मदत होणार आहे.
पाणीयोजनेसाठी शासनाकडे ३० कोटींचा प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 12:50 AM