नाशिक : शहर बस वाहतूक ताब्यात घेण्यासाठी महापालिकेने पुन्हा एकदा हालचाली गतिमान केल्या असून, खासगीकरणातून ही सेवा सुरू करण्यासाठी येत्या महासभेत प्रस्ताव ठेवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. महापालिकेत बससेवा सुरू करण्यासंदर्भात अनुकूल आणि प्रतिकूल असे दोन मतप्रवाह असून त्यामुळे ऐन गणेशोत्सवात बससेवेचा श्रीगणेशा होतो किंवा नाही याकडे पालिकावर्तुळाचे लक्ष लागून आहे.शहरात सुरू असलेली बससेवा चालविण्यास राज्य परिवहन महामंडळ तयार नाही. तोट्याच्या नावाखाली शहरातील अनेक भागात बसच्या फेऱ्या बंद करण्यात आल्या असून, महामंडळाने महापालिकेकडे भरपाई मागितली आहे. त्याचप्रमाणे ही सेवा महापालिकेनेच चालवावी, अशी महामंडळाची इच्छा आहे. सध्याचे राज्य सरकारदेखील तोट्यातील महामंडळाची जबाबदारी कमी करण्यासाठी प्रयत्नशील असून त्यामुळेच ही सेवा महापालिकेच्या गळ्यात मारण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उत्सुक आहेत. गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात क्रेडाईच्या प्रदर्शनासाठी आलेल्या महापालिकेच्या वतीने शहर बस वाहतूक सुरू करण्यासाठी शासनाच्या वतीने सहकार्य करण्यात येईल, असे जाहीर केले होते. महापालिकेच्या वतीने खासगीकरणातून ही सेवा सुरू करण्यासाठी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी क्रिसील कंपनीचा प्रस्ताव फेटाळून नव्याने प्रस्ताव तयार केला असून, नवी मुंबईच्या धर्तीवर ग्रॉस कॉस्ट कॉन्ट्रॅक्ट तत्त्वावर बससेवा सुरू करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. पहिल्या टप्प्यात तीनशे बस शहर वाहतुकीसाठी रस्त्यावर आणण्यात येणार आहेत. या बस इलेक्ट्रिकच्या असतील किंवा निम्म्या बस डिझेलच्या असतील. महापालिका सांगेल त्यामार्गावर बससेवा चालविणे ठेकेदाराला बंधनकारक असून, तिकिटामागे ठेकेदाराला रक्कम देण्याचा प्रस्ताव आहे. मध्यंतरी आयुक्तांनी हा प्रस्ताव मांडण्यासाठी हालचाली केल्या होत्या. मात्र त्यासंदर्भात महापालिकेतून तसेच बाहेरूनदेखील त्यास विरोधाचे सूर उमटू लागले होते. आता पुन्हा हे सर्व वातावरण तयार होयाची शक्यता आहे. नवी मुंबई पॅटर्नमहापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नवी मुंबईच्या धर्तीवर अनेक प्रकल्प राबविले आहेत. बससेवेसाठीसुद्धा हाच पॅटर्न नाशिकमध्ये असणार आहे. विशेष म्हणजे महापालिकेला बस खरेदी करायच्या नसून केवळ वाहकांची भरती होणार आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे स्थायी समिती एवढ्या तुल्यबळ मानली जाणारी परिवहन समितीच अस्तित्वात येणार नाही. यामुळे नगरसेवकांचा विरोध वाढण्याची शक्यता आहे.
शहर बससेवेचा प्रस्ताव येत्या महासभेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2018 1:29 AM
नाशिक : शहर बस वाहतूक ताब्यात घेण्यासाठी महापालिकेने पुन्हा एकदा हालचाली गतिमान केल्या असून, खासगीकरणातून ही सेवा सुरू करण्यासाठी येत्या महासभेत प्रस्ताव ठेवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. महापालिकेत बससेवा सुरू करण्यासंदर्भात अनुकूल आणि प्रतिकूल असे दोन मतप्रवाह असून त्यामुळे ऐन गणेशोत्सवात बससेवेचा श्रीगणेशा होतो किंवा नाही याकडे पालिकावर्तुळाचे लक्ष लागून आहे.
ठळक मुद्देपुन्हा तयारी : मुंढे यांनी दिला तयारीला वेग; गणेशोत्सवात मुहूर्ताची शक्यता