नाशिक : राज्याचे भरतपूर म्हणून लोकप्रिय असलेल्या नांदूरमधमेश्वर राष्ट्रीय पक्षी अभयारण्याच्या विकासासाठी प्रथमच पर्यटन विभागाने लक्ष घातले आहे. विविध सोयीसुविधांच्या दृष्टिकोनातून एमटीडीसीने प्रस्ताव तयार केला असून, त्यामुळे पक्षीनिरीक्षकांसाठी अनेक सुविधा उपलब्ध होणार आहेत.जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील नांदूरमधमेश्वर धरणाच्या बॅकवॉटरचे जलाशय विविध पक्ष्यांचे आकर्षण ठरले आहे. दरवर्षी या परिसरात हजारोंच्या संख्येने स्थानिक व परदेशी स्थलांतरित पक्ष्यांचे ‘हिवाळी अधिवेशन’च भरत आहे. यामुळे हिवाळ्याचे चार महिने या ठिकाणी मोठ्या संख्येने पर्यटकांची वर्दळ असते. वनविभागाच्या वन्यजीव खात्याकडून या पक्षी अभयारण्याच्या विकासासाठी प्रयत्न केले गेले. येथील देखभाल दुरुस्तीची संपूर्ण जबाबदारी वनखात्याकडे आहे. पक्ष्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तसेच संवर्धन व संरक्षित अधिवास असल्याकारणामुळे हे पक्षी अभयारण्य वनखात्याच्या वन्यजीव विभागाच्या अखत्यारितीत आहे. येथे येणाºया पर्यटकांची संख्या जरी जास्त असली तरी त्यांना मिळणाºया सोयीसुविधा मात्र तुटपुंज्या होत्या. यासंदर्भात पर्यटनमंत्री जयकुमार रावळ यांनी नैसर्गिक जैवविविधतेचे संवर्धन लक्षात घेत अभयारण्याच्या विकासाला पूरक ठरणाºया सोयीसुविधांचा प्रस्ताव राज्याचे पर्यटन महामंडळाला तयार करण्याचे आदेश अलीकडे झालेल्या नाशिक दौºयादरम्यान दिले. यानुसार महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक नितीनकुमार मुंडावरे यांनी ‘चापडगाव ग्राम संयुक्त वन व्यवस्थापन समिती’च्या गाइडसोबत चर्चा करून आवश्यक त्या सोयीसुविधांच्या गरजेबाबत प्रस्ताव तयार करून पर्यटन मंत्रालयाकडे पाठविला आहे. ज्येष्ठ नेते सुरेशबाबा पाटील यांनी यासंदर्भात रावळ यांना निवेदन दिले होते.
‘भरतपूर’च्या विकासासाठी प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 12:18 AM