नाशिक: वाड्या, वस्त्यांच्या नावातून जातीवाचक शब्द काढून टाकण्याचे राज्य शासनाचे आदेश असल्याने समाजकल्याण विभागाने आता याबाबतच्या हालचाली गतिमान केल्या आहेत. समाजकल्याण आयुक्तांनी या प्रकरणी राज्याचा आढावा घेतला असता नाशिक जिल्ह्यातील पाच तालुक्यांमधून वस्त्यांची नावे बदलण्यासाठीचे प्रस्ताव प्राप्त झाल्याचे समाजकल्याण विभागाकडून जाहीर करण्यात आले.
डिसेंबर २०२० मध्ये राज्य शासनाने वाड्या वस्त्यांच्या नावातून जातीवाचक शब्द रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार संबंधितांनी समाजकल्याण विभागाकडे प्रस्ताव सादर करावेत असे जाहीर करण्यात आले होते;मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्यामुळे समाजकल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी नुकताच आढावा घेतला. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना या विषयावर पुढील पंधरा दिवसांच्या आत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. यामुळे राज्यभरातील वाड्या-वस्त्यांच्या नावातून जात हद्दपार करण्याच्या विषयाला गती मिळणार आहे.
ज्या वाड्या,वस्त्यांच्या नावाने जात प्रतित होते अशी नावे बदलून समतानगर, क्रांतिनगर, भीमनगर, ज्योतीनगर, शाहूनगर असे नामकरण करण्याचे राज्य सरकारने ठरवले आहे. समाजकल्याण आयुक्त डॉ. नारनवरे यांच्या निर्देशानुसार नाशिक प्रादेशिक उपायुक्तांनी नाशिक विभागातील सर्व क्षेत्रिय अधिकाऱ्यांची दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून १५ जून रोजी बैठक घेतली. नाशिक जिल्ह्यात २७७ वस्त्या असून नाव बदलण्यासाठी पाच तालुक्यांमधून प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. उर्वरित सहा तालुक्यातून प्रस्ताव लवकरच प्राप्त होणार आहेत. तर तीन तालुक्यातील वस्त्यांची नावे बदलण्याची आवश्यकता नसल्याची माहिती जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाने दिली आहे.
दरम्यान, नारनवरे यांनी दि. १६ रोजी राज्यातील सर्व विभागीय आयुक्तांना या विषयावर विनंती करणारे पत्र लिहिले होते त्यानुसार विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दूरदृष्य प्रणालीद्वारे पाचही जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त यांची बैठक घेत याबाबतची कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत.