नाशिक महानगरपालिका शिक्षण विभागातील प्राथमिक शिक्षक गेल्या वर्षभरापासून निवारा शेड, माझे कुटुंब माझी जबाबदारी, शाळाबाह्य मुले सर्वेक्षण, कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग सर्वेक्षण, अँटिजन टेस्ट, लसीकरण तसेच विभागीय अधिकारी कार्यालयात संपर्क कक्षात कोरोना ड्युटीवर आपले कर्तव्य बजावत आहेत. कोविड साथरोग संबंधित कर्तव्य बजावत असताना सातपूर विभागीय कार्यालयात संपर्क कक्षात कोरोना ड्युटीवर असताना राजेंद्र म्हसदे, गोविंद पवार या शिक्षकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या शिक्षकांना ५० लाखांचे विमा कवच, सानुग्रह साहाय्य, अनुकंपा प्रस्ताव तसेच काॅन्टॅक्ट ट्रेसिंग करणाऱ्या शिक्षकांना विमा कवच, मेडिकल सुरक्षा किट व कोरोनाबाधित शिक्षकांसाठी मनपा अथवा खाजगी हॉस्पिटलमध्ये तत्काळ ऑक्सिजन, व्हेंटिलेटर असलेला बेड, शिक्षक व त्यांच्या कुटुंबीयांना उपचार घेताना रेमडेसिविर इंजेक्शन ताबडतोब उपलब्ध करून द्यावेत. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक सेनेचे सुरेश खांडबहाले, शिवाजी शिंदे यांनी मनपाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रवीण अष्टीकर, सुरेश खोडे, शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांची भेट घेतली. शिक्षकांना ५० लाख विमा प्रश्नी शासन निर्णयानुसार प्रस्ताव सादर करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. कोरोना ड्युटीवर असलेल्या शिक्षकांना मास्क, फेसशिल्ड, सॅनिटायझर, पीपीइ किट आदी सुरक्षा किट पुरविले जाईल. तसेच हॉस्पिटलमध्ये बेड, रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध करून दिले जाईल, असे आश्वासन अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रवीण अष्टीकर यांनी दिले.
(फोटो ०८ मनसे) मनपा अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रवीण अष्टीकर यांना विविध मागण्यांचे निवेदन देताना महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक सेनेचे अध्यक्ष सुरेश खांडबहाले. समवेत सरचिटणीस शिवाजी शिंदे.