लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : अवकाळी पावसामुळे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील अनेक शाळांचे पत्रे व कौले उडून गेली असून, सध्या शाळा सुरू झाल्याने कधीही पावसाचे आगमन होवू शकते. त्यामुळे अशा शाळांमधील विद्यार्थ्यांचे पावसापासून बचाव करण्यासाठी पत्रे उडालेल्या शाळांची दुरुस्ती करण्याचे प्रस्ताव तातडीने तयार करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत देण्यात आल्या.
स्थायी समितीची सभा अध्यक्ष शीतल सांगळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यावेळी बांधकाम सभापती मनीषा पवार यांनी शाळा दुरुस्तीसाठी शासनाकडून निधी प्राप्त झालेला असतानाही ग्रामीण भागातील शाळा दुरुस्ती होत नसल्याबद्दल नागरिक तक्रारी करीत असून, शिक्षण विभागाला किती निधी प्राप्त झाला आणि त्यातून कधी कामे होणार असा सवाल केला, तर आत्माराम कुंभार्डे यांनी चांदवड तालुक्यात अवकाळी वादळी पावसामुळे अनेक शाळांचे पत्रे उडाल्याने त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, दुरुस्ती करावयाच्या शाळांचा प्राधान्यक्रम ठरवून समितीची मान्यता मिळण्याची वाट न पाहता ज्या शाळांचे पत्रे उडाले व किरकोळ खर्चाचे काम असेल तर त्याचे स्वतंत्र प्रस्ताव तयार करण्याची सूचना केली. यावर मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गिते यांनीही सहमती दर्शवित वादळामुळे नुकसान झालेल्या शाळांची माहिती सदस्य, गट शिक्षणाधिकारी व गट विकास अधिकाऱ्यांकडून मागवून प्राधान्यक्रम ठरवावे व शिक्षण समितीच्या बैठकीत त्याची मान्यता घेऊन आठ दिवसांत आपल्याकडे स्वतंत्र प्रस्ताव सादर करावे, असे निर्देश दिले. शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांनी शाळा दुरुस्तीसाठी आठ कोटींचा निधी प्राप्त झाला असल्याचे सांगून, २८ जून रोजी शिक्षण समितीच्या बैठकीत शाळा ठरविण्यात येणार असल्याचे सांगितले.आंतर जिल्हा बदली करून आलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीबाबत मनीषा पवार यांनी प्रश्न विचारून लवकरात लवकर शिक्षकांना नियुक्त्या देण्याची मागणी केली. त्यावर शासनाकडून नियुक्ती देण्याबाबत नवीन आदेश प्राप्त झाले असून, त्यानुसार येत्या सोमवारपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याचे शिक्षणाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.