नाशिक : सामान्य गावासाठी २ हजार लोकसंख्येहून अधिक तर आदिवासी क्षेत्रातील गावासाठी १ हजारहून अधिक लोकसंख्या ओलांडलेल्या गावांना नवीन ग्रामपंचायतचा प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील केवळ सुरगाणा तालुक्यातूनच केवळ ४१ नवीन ग्रामपंचायतचे प्रस्ताव तयार केले जाऊ शकतात. मात्र, गतवर्षी डिसेंबर महिन्यातच संबंधित ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या असल्याने निवडणुकांनंतर किमान २ वर्षे नवीन ग्रामपंचायतींचे प्रस्ताव पाठवता येत नसल्याने त्या गावांनादेखील ग्रामपंचायतीच्या दर्जाचा प्रस्ताव पाठविण्यासाठी २०२५ पर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने नुकत्याच घेतलेल्या निर्णयानुसार प्रत्येक जिल्ह्यातून नवीन ग्रामपंचायतींचे प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. किमान २ हजार लोकसंख्या, जवळच्या गावापासूनचे अंतर यासह विविध निकषांचा त्यात अंतर्भाव असतो. त्यानुसार प्रत्येक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी नवीन गावांच्या मागणीचे प्रस्तावदेखील पाठवावेत, असे आदेश राज्य शासनाने काढले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील नवीन ग्रामपंचायतींसाठीची माहिती गोळा करण्यात येत आहे. प्राथमिक स्तरावर केवळ सुरगाण्यातूनच तशा स्वरूपाचे प्रस्ताव पाठविणे शक्य असल्याचे उपलब्ध आकडेवारीतून दिसून येते.
सुरगाण्यातील ४१ गावांनी एक हजार लोकसंख्येचा निकष पूर्ण केला आहे. मात्र, तिथे गतवर्षीच निवडणुका झाल्या असल्याने येत्या २०२४ अखेरपर्यंत त्या ग्रामपंचायतींचे नवीन प्रस्ताव तांत्रिक बाबींमुळे पाठविता येणार नाहीत. दरम्यान राज्य शासनाच्या जूनच्या अधिसूचनेद्वारे महिन्याच्या प्रारंभीच गोधड्याचा पाडा ही स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन केली आहे. त्यामुळे त्र्यंबकेश्वर तालुक्यात एकूण ८५ ग्रामपंचायती स्थापन झाल्या आहेत. स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन झाल्यामुळे स्वतंत्र कार्यकारिणी, ग्रामपंचायत कार्यालय, पंधरावा वित्त आयोग व पेसा निधी स्वतंत्रपणे मिळणार आहे. सदर नवीन ग्रामपंचायत स्थापनेमध्ये वाघेरे गोधड्याचा पाडा यांच्या कार्यकारिणी, मत्ता व दायित्व तसेच इतर कामकाज याबाबत स्वतंत्र आदेश निर्गमितही करण्यात आले आहेत.