नाशिक : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात होणाऱ्या कवी कट्ट्यासाठी राज्यासह राज्याबाहेरुन देखील कवितांचा जबरदस्त ओघ सुरू झाला आहे. मात्र, यंदाच्या वर्षापासून प्रथमच सुरू करण्यात येणाऱ्या गझल काव्य वाचनासाठी मात्र अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याने आयोजक देखील चिंतेत पडले आहेत. त्यामुळेच हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी अधिकाधिक गझल पाठविण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.
संमेलनाच्या आयोजकांकडे गत महिनाभरात प्राप्त झालेल्या रचनांमध्ये कवितांचे प्रमाण हजारात तर गझलांचा टक्का मात्र अत्यल्प आहे. फेब्रुवारीच्या पूर्वार्धापर्यंत आलेल्या हजारभर कवितांमधे गझलांचे प्रमाण फक्त पन्नास होते. येणाऱ्या गझलांच्या दर्जाबाबत निवड समिती दक्ष असल्याने त्यांनी निवड प्रक्रियेबाबत काही नियमदेखील केले आहेत. आयोजकांकडे पाठविण्यात येणारी कविता,गझल स्वरचितच असावी, एका कवीने एकच गझल पाठवावी. तसेच प्रत्येक कवीला सादरीकरणाला तीन मिनिटे वेळ निश्चित करण्यात आलेला असल्याने संबंधित रचना आटोपशीर असावी असेही नियम घालून देण्यात आले आहेत. तसेच गझल ई मेलद्वारे पाठवताना कविते खालीच आपले नाव, पत्ता, ई मेल आयडी ,मोबाईल नंबर अशी माहिती देणे बंधनकारक करण्यात आले आहे. तर कविता पोस्टाने पाठविताना पाकिटावर कवी कट्टा असा स्पष्ट उल्लेख करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
इन्फो
गझलच्या स्वतंत्र सत्रासाठी प्रयास
या भव्य सोहळ्यात काव्यवाचन कार्यक्रमात ‘गझल’ हे आकर्षण केंद्र कसे राहील, यासाठी आयोजक प्रयत्नशील आहेत. पुरेशा प्रमाणात चांगल्या दर्जाच्या गझल प्राप्त झाल्यास गझल काव्य प्रकाराचे स्वतंत्र सत्र कसे घेता येईल, यासाठी आयोजन समिती प्रयत्न करीत आहे. त्यामुळे येणाऱ्या गझलांच्या दर्जात्मक निवडीसाठी स्वतंत्र ‘गझल निवड समिती’ नियुक्त करण्यात आली आहे. ही गझल समिती ज्या गझलांची निवड करेल, त्यांनाच सादरीकरणाची संधी मिळू शकणार आहे.
लोगो
साहित्य संमेलन लोगो वापरावा.