नाशिक : जगाच्या पाठीवरून नामशेष होत चाललेला निसर्गाचा खरा सफाई कामगार व नैसर्गिक जैवविविधतेमधील अन्नसाखळीचा महत्त्वाचा घटक असलेला गिधाड हे संरक्षित वन्यजीव दुर्मिळ झाले आहे. भारतातही गिधाडांच्या दोन जाती आढळतात; मात्र त्याची संख्या अत्यंत कमी झाली असल्याने संवर्धन काळाची गरज बनली आहे.
गिधाडाच्या संवर्धनासाठी नाशिक जिल्ह्यातही वनविभागाच्या वतीने लोकसहभागातून प्रयत्न केले जाऊ लागले आहे. नाशिकमध्ये गिधाडांचे अस्तित्व आढळून येत आहे. शहरासह जवळच्या आदिवासी तालुक्यांमधील डोंगरमाथ्यांवर गिधाडांचे वास्तव्य असल्याचे पुढे आले आहे. अंजनेरी, हरसूल, त्र्यंबकेश्वरनंतर दिंडोरी तालुक्यातील कनाशी वनपरिक्षेत्रातील देवसाने गावाच्या शिवारातही गिधाडांचे वास्तव्य असल्याचे समोर आले असून हे शुभ वर्तमान मानले जात आहे.
एकूणच गिधाड संवर्धनासाठी वनविभागाकडून पुढचे प्रभावी पाऊल टाकण्यात आले आहे. लवकरच गिधाड सुरक्षित क्षेत्रासाठी बॉम्बे हिस्ट्री नेचर सोसायटीच्या मदतीने अंजनेरी केंद्रबिंदू ठरवून शंभर किलोमीटरच्या परिघात चारही दिशांना अभ्यास करुन निरीक्षणे नोंदविली जाणार आहे. गिधाडांसाठी सुरक्षित असलेला भाग म्हणून घोषित करण्यासाठी हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.