नाशिक : न्यायालयाने आदेश देऊनही नदीपात्रात कपडे आणि वाहने धुतली जात असल्याने गोदावरी नदीचे प्रदूषण थांबत नसून त्यावर उपाय करण्यासाठी आता नदीपात्राच्या काही भागांत संरक्षक जाळ्या बसविण्यात येणार आहेत. विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. गोदावरी नदीच्या प्रदूषणाच्या विरोधात राजेश पंडित यांनी २०१२ मध्ये जनहित याचिका दाखल केली असून, त्याअनुषंगाने न्यायालयाने नाशिकच्या विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समिती स्थापन केली असून, समितीची दर दोन महिन्यांनी बैठक घेण्यात येते त्यानुसार विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच समितीची बैठक संपन्न झाली. यावेळी विविध निर्णय घेण्यात आले. नदीपात्रात वाहने आणि कपडे धुण्यास प्रतिबंध केला असतानादेखील हे प्रकार घडत आहेत. त्यामुळे काही भागात संरक्षक जाळ्या बसविण्याचे ठरविण्यात आले. याशिवाय पोलिसांनी नियम भंग करणाऱ्यांवर तातडीने गुन्हे दाखल करावेस, असे निर्देशित केले. महापालिकेने गोदावरी नदीच्या काठी निर्माल्य आणि अन्य कचऱ्याचे संकलन करण्यासाठी वेगवेगळी व्यवस्था करावी म्हणजेच निर्माल्य कलश आणि कचरापेटीची व्यवस्था करावी आणि सर्व कचरा सकाळी ११ वाजता आणि रात्री नऊ वाजता उचलावा, तसेच अधिक मनुष्य बळाची व्यवस्था करून पाणवेली काढण्याची व्यवस्था करावी, गोदावरी नदीच्या तीरावरील मलजल वाहून नेणाऱ्या आणि पुरामुळे फुटलेल्या सर्व मलवाहिका आणि चेंबर्स दुरुस्त करण्याची व्यवस्था करावी, असे ठरविण्यात आले. त्र्यंबकरोडवर पिंपळगाव येथे मलजल प्रक्रिया केंद्र बांधण्यासाठी तातडीने भूसंपादन करावे, अशी महापालिकेला सूचना करण्यात आली. तर नीरीने भूजलस्त्रोतांचे सर्वेक्षण करावे, असे निर्देश देण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन्, तसचे महापालिका, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ, औद्योगिक विकास महामंडळ आणि पोलीस खात्याचे अधिकारी उपस्थित होते.
नदीपात्राला संरक्षक जाळ्या
By admin | Published: January 22, 2017 11:02 PM