ठळक मुद्दे वडाचा डेरेदार वृक्ष जेसीबीने जमिनदोस्त केला. वटवृक्ष हा किमान दहा ते पंधरा वर्षे जुना
नाशिक : उच्च न्यायालयाने वड प्रजातीची झाडे तोडण्यास मनाई केली असतानाही नाशिक महापालिकेने मुंबईनाका परिसरातील अनधिकृत धार्मिक स्थळ हटविण्याच्या कारवाईदरम्यान शनिवारी येथील धार्मिक स्थळापासून काही फुटांवर असलेल्या वडाचा डेरेदार वृक्ष जेसीबीने जमिनदोस्त केला. या कारवाईच्या निषेधार्थ वृक्षप्रेमींनी रविवारी संध्याकाळी सदर ठिकाणी हजेरी लावून बुंध्यावर मेणबत्त्या प्रज्वलित करुन श्रध्दांजली दिली.महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाने शनिवारी जेसीबीच्या सहाय्याने वटवृक्ष पाडल्यामुळे नागरिकांसह वृक्षप्रेमींनी पालिकेच्या या कारवाईचा निषेध नोंदवून संताप व्यक्त केला आहे. वड प्रजातीच्या वृक्षांना उच्च न्यायालयाचे संरक्षण असतानाही पालिकेने अवैधरित्या हा वड जमिनदोस्त करुन न्यायालयीन आदेशाचा अवमान केल्याचा आरोप वृक्षप्रेमींनी केला आहे. मानव उत्थान मंच व जिल्हा पर्यावरण समितीचे सदस्य जगबीर सिंग यांच्यासह भारती जाधव, प्रिती पारख आदि उपस्थित होते.
सदर वटवृक्ष हा वाहतूकीला अडथळा ठरणारा नव्हता, असे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे. या वटवृक्षाच्या बाबतीत पालिकेने वृक्ष प्राधिकरण निर्णय समितीपुढे कुठलाही विषय मांडलेला नव्हता. एकूणच हा वटवृक्ष तोडण्याबाबतची कुठलीही परवानगी महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाकडे नव्हती; मात्र तरीदेखील पालिकेच्या पथकाने वटवृक्षावर जेसीबी फिरविल्याने संताप व्यक्त होत आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी न्यायालयात दाद मागणार असल्याचे सिंग यांनी सांगितले. सदर वटवृक्ष हा जास्त जुना नव्हता मात्र किमान दहा ते पंधरा वर्षे जुना असावा असा अंदाज परिसरातील नागरिकांनी व्यक्त केला आहे. हा हिरवागार डेरेदार वृक्षाचा विस्तार होत असताना अतिक्रमण निर्मूलन पथकाचे प्रमुखांनी आपल्या पथकाचा प्रताप झाकण्यासाठी थेट वडाच्या वाढत्या झाडाच्या मुळ्या कमकुवत झाल्या होत्या आणि तो उन्मळून पडणार असल्याचे भाकित करुन वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केल्याचे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे.