मनमाड : इंधन कंपन्या व शासनाचा मनमानी कारभार व अधिकृत विक्रेत्यांचे कमिशन वाढवून मिळावे यासाठी पुकारण्यात आलेल्या देशव्यापी खरेदी बंद लक्षवेधी आंदोलनास मनमाडमध्ये संमिश्र प्रतिसाद पाहायला मिळाला. शहरापासून जवळ असलेल्या पानेवाडी शिवारातील भारत पेट्रोलियम कंपनीसमोरील मोकळ्या पटांगणात जिल्हा पेट्रोल डीलर्स वेल्फेअर असोसिएशनच्या नेतृत्वाखाली जोरदार घोषणाबाजी देत इंधन कंपनीच्या मनमानी कारभाराचा निषेध करीत लक्षवेधी आंदोलन केले. नाशिकसह नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यातील जवळपास २०० अधिकृत विक्रेत्यांनी या आंदोलनात सहभाग नोंदवला.
शहरापासून जवळ असलेल्या इंधन प्रकल्पांमधून उत्तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पेट्रोल आणि डिझेल पुरवठा केला जातो, मात्र गेल्या काही दिवसांपासून डिझेलसाठी अघोषित कोटा लागू केल्यामुळे अधिकृत विक्रेत्यांना मागणीच्या २० टक्केच पुरवठा करण्यात येत असल्याने शहर परिसरात डिझेल पंप ड्राय झाले. म्हणजेच इंधन शिल्लक नसल्याचे दिसून आले. मंगळवारी देशव्यापी आंदोलनात सहभागी होत इंधन खरेदी न करण्याचा निर्णय विक्रेत्यांनी घेतल्यामुळे काही ठिकाणी इंधन भरण्यासाठी गर्दी, तर काही पंपांवर इंधन शिल्लक नसल्याचे दिसून आले.
२०१७ पासून आजपर्यंत इंधनाच्या किमती दुप्पट झाल्या. गुंतवणूक खर्च, बँकांचे व्याज, पगार, वीजबिल आदी खर्चातही दुप्पट वाढ झाली. परंतु पेट्रोल, डिझेलचे मार्जिन सुधारले नाही. त्यातच ४ नोव्हेंबर २०२१ व २१ मे २०२२ या दिवशी केंद्राने कपात केल्याने इंधनाच्या किमती ८ ते १२ रुपयांनी कमी झाल्या व त्याची अंमलबजावणी कमी केलेल्या एक्साइज दराने ताबडतोब करायला लावली. त्यामुळे पंपचालकांचे मोठे नुकसान झाले. अशी भूमिका मांडण्यात आली. शासनाने पूर्वीची १५ दिवसांनी दर बदलण्याची पद्धत सुरू करावी, अशी मागणी पेट्रोलपंपचालकांनी यावेळी केली. ऑइल कंपन्या डीलर्सचे मार्जिन सुधारत नाहीत, तसेच इतर समस्यांच्या निराकरणासाठी चर्चेस तयार नाही. यासाठी ३१ मे रोजी एक दिवस खरेदी बंद ठेवून केंद्र शासन व इंधन कंपन्या यांचे लक्ष वेधून एकजुटीचे प्रदर्शन करण्यासाठी महाराष्ट्रातील ६५०० पेट्रोल पंप या आंदोलनात सहभागी झाल्याचा दावाही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला.
सदर आंदोलनात असोसिएशनचे अध्यक्ष भूषण भोसले, माजी अध्यक्ष नितीन धात्रक, उपाध्यक्ष साहेबराव महाले, सचिव सुदर्शन पाटील, सदस्य तेहसीन खान, दिनेश धात्रक, हेमचंद्र मोरे, सुजय खैरनार, डी. व्ही. शहा, संजय कोठुळे, विनोद बनकर, राकेश जगताप, तुषार मरसाळे, चिनूभाई शहा, संजय धोंगडे, प्रवीण महाजन, पंकज कोकाटे, भारत टाकेकर, शरद गुंजाळ, झिया जारीवला, नीलेश लोंढा, मोहित नानावटी, अमोल शिंदे, सूरज पवार आदींसह नाशिक, धुळे व नंदुरबार येथून अधिकृत विक्रेते उपस्थित होते.
कोट : भारत पेट्रोलियम इंधन कंपनीने गेले दोन दिवस कंपनीच्या विविध कारणांसाठी इंधन पुरवठा थांबवला आहे. त्यामुळे ग्राहकांना इंधन देण्यात अडथळा आला तर त्याची जबाबदारी अधिकृत विक्रेत्यांची नसून कंपनीची व शासनाची आहे.
- भूषण भोसले, अध्यक्ष, नाशिक जिल्हा पेट्रोल डीलर्स वेल्फेअर असोसिएशन