नाशिक : नागरिकत्व दुरूस्ती कायदा (सीएए) व एनआरसीविरोधात शहरातील मुस्लीम बांधवांनी मोठ्या संख्येने शहाजहॉँनी ईदगाह मैदानावर एकत्र येत सरकारचा निषेध करीत रविवारी (दि.२२) जाहीर सभेतून शांततेत लोकशाही मार्गाने हल्लाबोल केला. भारतीय संविधानविरोधी या कायद्याची या धर्मनिरपेक्ष देशात गरज नाही, यामुळे तत्काळ सीएए कायदा व एनआरसीची प्रक्रिया सरकारने रद्द करण्याची घोषणा करत देशाची एकता व अखंडता जोपासावी, असा सूर या जाहीर सभेतून उमटला.नागरिकत्व दुरूस्ती कायद्याला देशभरातून कडाडून विरोध होत असताना नाशिकमधूनदेखील जोरदार विरोध होताना दिसून येत आहे. गेल्या गुरूवारी संविधानप्रेमी नागरिकांनी एकत्र येत शहरातून मोर्चा काढला होता. या मोर्चाला देखील उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. यानंतर रविवारी मुस्लीम समुदायाच्या वतीने सीएए कायद्याविरूध्द बोलविलेल्या जाहीर निषेध सभेत इदगाह मैदानावर सुमारे पाच हजार नागरिकांनी उपस्थिती दर्शविल्याचे पोलीस प्रशासनाच्या विशेष शाखेच्या सुत्रांनी सांगितले.शहर-ए-खतीब हाफीज हिसामुद्दीन अशरफी यांच्या नेतृत्वाखाली सुन्नी मरकजी सिरत समिती, रजा अकादमी, नुरी अकादमी, सुन्नी दावत-ए-इस्लामी, दावत-ए-इस्लामी यांसारख्या धार्मिक संघटनांसह जुने नाशिक, वडाळागाव, नाशिकरोड, देवळाली गाव, देवळाली कॅम्प आदि भागातील मुस्लीम युवक मित्रमंडळांनी पुढाकार घेत ईदगाह मैदानावरील सभा आयोजित केली. या सभेसाठी शहरातील मुस्लीम बहुल भागातून मोठ्या संख्येने नागरिकांनी हजेरी लावली. ईदगाह मैदानावर सकाळी साडेदहा वाजेपासून लोक जमण्यास सुरूवात झाली. अकरा वाजेच्या सुमारास निषेध सभेला प्रारंभ करण्यात आला. यावेळी निम्म्यापेक्षा अधिक मैदान गर्दीने तुडूंभ भरले होते. ईदगाहच्या विचारमंचावर शहर-ए-काजी सय्यद मोईजोद्दीन, मौलाना शमशोद्दीन मिस्बाही, मौलाना मुफ्ती सय्यद आसिफ इकबाल, मौलाना मुफ्ती महेबुब आलम, मौलाना हाफीज अब्दुल जब्बार, मौलाना मुफ्ती रहेमत अली, मौलाना कारी हाफीज जाहीद, मौलाना इब्राहीम, मौलाना कारी रईस, मौलाना शाकीर रजा, मौलाना कारी जुनेद आलम,मौलाना हुसेन, बडी दर्गा हाजी वसीम पिरजादा, एजाज रजा मकरानी, हाजी ईशाद रजवी, एजाज काजी यांच्यासह माजी आरोग्यराज्य मंत्री डॉ. शोभा बच्छाव, महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष जयंत जायभावे, कॉँग्रेसच्या प्रवक्ता डॉ. हेमलता पाटील, राष्ट्रवादीचे गटनेता गजानन शेलार, नगरसेवक मुशीर सय्यद, वत्सला खैरे, शरद आहेर, रंजन ठाकरे, केशवअण्णा पाटील, राजू देसले, जगबीरसिंग खालसा, किरण मोहिते आदि राजकिय, सामाजिक पदाधिकारी उपस्थित होते. सभेच्या प्रारंभी हाफीज कारी रईस यांनी धर्मग्रंथ कुराणमधील श्लोक पठण केले. मौलाना महेबुब आलम यांनी प्रास्ताविक व सुत्रसंचालन केले. आभार शहर-ए-खतीब यांनी मानले.