मालेगाव मध्य : शहरातील दत्तनगर भागात सर्व्हे नं. १६८/६९ मध्ये १३ घरांचे अतिक्रमण काढण्यास गेलेल्या मनपाच्या अतिक्रमण विरोधी पथकाच्या कारवाईस विरोध करीत नागरिकांनी ठिय्या आंदोलन केले. पोलिसांनी नागरिकांची समजूत काढल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.दत्तनगरात राज्य सरकारच्या अल्प संख्यांक विभागाकडून ८ कोटी रूपये खर्चून उर्दू घराचे बांधकाम करण्यात आले. सदर इमारतीच्या बाजूस असलेली अतिक्रमीत घरे अडथळा ठरत असल्याने ती काढण्याची मागणी केली जात होती. त्यासाठी आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलनही करण्यात आले होते; परंतु महासभेत सदर जागेवरील रहिवाशांना भाडे तत्वावर खरेदी देण्यास मंजुरी देण्यात आली. मनपाच्या अतिक्रमण विभागाचे अधीक्षक राजू खैरनार, प्रभाग अधिकारी पंकज सोनवणे, दिपक हातगे यांच्या उपस्थितीत १३ घरांचे अतिक्रमण काढण्यासाठी पथक गेले असता त्यास महिलांनी विरोध करीत रस्त्यावर ठिय्या आंदोलन केले. पवारवाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक गुलाबराव पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत महिलांची समजूत काढून रस्ता मोकळा केला. सध्या विद्यार्थ्यांच्या दहावीच्या परिक्षा सुरू असून महानगर पालिकेने कोणतीही पूर्व सूचना न देता अतिक्रमण हटविण्यासाठी पथक पाठविल्याने महिलांनी रस्त्यावर येत ठिय्या आंदोलन केले. मनपाच्या सदर कारवाईस स्थगिती देण्यात यावी, अशी विनंती याचिका येथील रहिवाशी शफीक अहमद जमील हाजी यांनी येथील न्यायालयात केली आहे.
अतिक्रमण काढण्यास विरोध; मालेगावी नागरिकांचा ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 12:45 PM