उत्तर प्रदेश सारख्या राज्यात लहान मुली, युवती, अंगणवाडीच्या ५० वर्षीय महिलाही सुरक्षित नाहीत. या घटनांना मुख्यमंत्री अजय बिष्ट हे जबाबदार असून, ते फक्त शहरांची नाव बदलण्यात मश्गुल झालेले आहे. देशातील एका मोठ्या राज्यात होणाऱ्या अशा घटना या देशाचा नाव शरमेने खाली करणाऱ्या आहेत, असा आरोप करून राष्ट्रवादी महिला काँग्रेसने नाशिक मुख्य टपाल कार्यालय बाहेर जमून निदर्शने केली, तसेच त्याच मुद्द्यावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अजय बिष्ट याचे नावे पत्रे लिहून ते पोष्टाद्वारे पाठविण्यात आले. यावेळी राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्या चंद्रमुखी देवी यांच्या वक्तव्याचाही महिलांनी निषेध करत त्यांच्या प्रतिमेला काळे फासले. बदायुं रेप हत्या प्रकरणात बेजबाबदार पणाने वक्तव्य करणाऱ्या सदस्याला महिलांच्या अधिकार व सुरक्षेविषयी काहीच ज्ञान नाही. या बेशरम महिलेने आपली निष्क्रियता आणि अज्ञानता दाखविली आहे, अशी टीका जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे यांनी केली. यावेळी सायरा शेख, नीलिमा काळे, पुष्पलता उदावंत, सुवर्णा दोंदे, संध्या भगत, मेघा दराडे, वर्षा लिंगायत, सरला गायकवाड, गायत्री झांजरे, आफरीन सय्यद, रुबीना सय्यद, कल्पना रामराजे, आयशा शेख, चंद्रभागा केदारे आदीं महिला उपस्थित होत्या. (फोटो ०९ एनसीपी)
महिला अत्याचाराच्या विरोधात राष्ट्रवादी महिलांची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 4:11 AM